
महाराष्ट्र घडविण्याच्या या कामात आपण काय सहभाग देऊ इच्छिता?
आमच्यापर्यंत पोचवा #SakalForMaharashtra हा हॅशटॅग वापरून.
ई-मेल कराः webeditor@esakal.com
Call Center : 9225800800
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-महिलांच्या उत्थानासाठी समाजातील सेवाभावी व्यक्ती व संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्यामुळे महाराष्ट्राचे समाजमन अस्वस्थ आहे. केवळ मराठाच नव्हे तर अन्य समाजही विविध मागण्यांसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. खरेतर सगळ्याच समाजाचे प्रश्न पोटापाण्याशी संबंधित आहेत. 'सकाळ'च्या आवाहनाची दखल घेऊन काही मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया.
बहुतांश वेळेस समाजाला काय हवे, तसेच तळागाळातील प्रश्न पुढारी, शासनकर्ते यांना माहित होत नाहीत. अर्थात या सर्व गोष्टींची माहिती समाजापर्यंत पोचविण्यासाठी समाज प्रबोधन गरजेचे आहे. स्वयंरोजगाराचा मोठा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी केंद्र-राज्य सरकारने अर्थसहाय्य करुन जिल्हा, त्यानंतर तालुका पातळीवर यासाठी व्यवस्था करावयास हवी. समाजातील मान्यवरांनी व्यापक विचार करुन समाजाच्या भल्यासाठी योगदान द्यायला हवे. असे झाल्यासच सध्याचे वातावरण निवळण्यास मदत होईल.
- सुनील बिजलगावे- पाटील, नांदेड
महाराष्ट्रातील तरुणांचा रोजगाराचा प्रश्न गंभीर बनल्यामुळे कृतीशील कार्यक्रमाची गरज आहे. धनिकांना शिक्षणासह सर्वकाही मिळते. दुर्बल घटकांत हुशार असलेल्या तरुणांनाही पुरेसे शिक्षण घेता येत नाही. मग रोजगार मिळत नाही. त्यामुळे आधी शिक्षण व्यवस्था बदलली पाहिजे. मी स्वतः "सीए' असल्यामुळे मला सध्याच्या शिक्षणामध्ये मुलांना येणाऱ्या आर्थिक अडचणींबाबत कल्पना आहे. युवापिढी कार्यक्षम करण्यासाठी, त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी "सकाळ'ने पुढाकार घेऊन कृतिशील उपक्रम सुरु केला, याला सर्वपरीने पाठिंबा राहील.
- राजेंद्र काळे, नगर
मराठा आरक्षणाची मागणी अनेक वर्षांची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार शंभर दिवसात आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन निवडून आले आहे. त्यांनी आता मराठ्यांचा ओबीसीत समावेश करावा. ओबीसी वेगळा प्रवर्ग करता येतो. अनुसूची नऊ-बमध्ये मराठ्यांना आरक्षण मिळू शकते. समाजाच्या मागासलेपणाचे पुरावे गोळा करण्यासाठी संशोधक म्हणून मदत केली आहे. "सारथी' संस्थेची मागणी कोल्हापुरात सुरवातीला मागणी केली होती. समाज म्हणून संबंधित घटकांनीही काम करायला पाहिजे. वसतिगृहे सुरु करावीत. शिक्षणासाठी फंड उभारला जाऊ शकतो. मराठा संस्थानिकांनी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे.
- इंद्रजीत सावंत, कोल्हापूर
मराठा युवकाने पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत जे काही उद्योग, व्यवसाय असतील, त्यात कोणतीही लाज न बाळगता ते उभारावेत. प्रत्येकानेच नोकरीच्या मागे न लागता उद्योगधंद्यांकडे वळावे. समाज बांधवांनाही सोबत घ्यावे. याबाबत "सकाळ'ने काही उपक्रम राबविल्यास आमचे पूर्ण सहकार्य असेल. ते उपक्रम आम्ही गावपातळीपर्यंत पोचवू. कर्ज मिळण्यासाठी त्यांना मदत करु शकतो. मराठा क्रांती मोर्चाद्वारे युवकांसाठी मदत करण्याचे काम आम्ही सुरु केले आहे.
- डॉ. संजय पाटील, सांगली