पदवीधर निवडणूक : आज मराठवाड्यातील ८१३ केंद्रांवर होणार मतदान

मधुकर कांबळे
Tuesday, 1 December 2020

नोकरदार पदवीधरांना मतदानासाठी नैमित्तीक रजा 

औरंगाबाद : पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.एक ) सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळात विभागातील मराठवाड्यातील ८१३ केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. साहित्यासह कर्मचारी सोमवारी (ता.३०) मतदान केंद्रांवर दाखल झाले. मतदानाचा पदवीधर कर्मचाऱ्यांना हक्क बजावता यावा यासाठी त्यांना नैमित्तीक विशेष रजा घेता येणार आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

औरंगाबाद विभागाच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून पूर्ण तयारी केली आहे. सोमवारी (ता. ३०) चिकलठाणा एमआयडीसीतील कलाग्राम येथे मतदान प्रक्रियेसाठीचे साहित्य वाटप करण्यात आले. मतदानासाठी लागणारे साहित्य घेऊन मतदान कर्मचारी मतदान केंद्रावर दाखल झाले. शहर आणि परिसरातील मतदान केंद्रावर पोलिंग पार्टींना शहर बसेसमधून केंद्रांवर नेऊन सोडण्यात आले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

जिल्ह्यात एक लाख सहा हजार ३७९ मतदार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी २०६ मतदान केंद्रांसाठी ३०६ वाहने उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. जिल्ह्यात १८१ प्राप्त टपाली मतपत्रिका आहेत. जिल्ह्यातील एकूण २०६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेसाठी १०४ अधिकारी, २०६ कर्मचारी, जिल्हा कोविड आरोग्य केंद्र, जिल्हा कोविड रूग्णालय आणि कोविड केअर सेंटरमध्ये एकूण ९९ अधिकारी आणि एकूण ८० रूग्णवाहिका उपलब्ध असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

पदवीधर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून नोकरदार मतदारांना नैमित्तीक रजा मंजूर करावी. ही रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातील उपआयुक्त तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी म्हटले आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मास्क, सॅनिटायझर, थर्मल गन 
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर विभागातील ८१३ मतदान केंद्रांवर १ लाख ५२ हजार सर्जिकल मास्क देण्यात आले आहेत. ८ हजार २०० हातमोजे जोडी, ९ हजार २०० फेसशिल्ड, सनिटायझर, थर्मल गन, ऑक्सीमीटर, डिस्पोजल कैप, बायोमेडिकल कलेक्शन बॅग, साबन लिक्विड सोप आदी साहित्य देण्यात आले आहे. 

खासगी आस्थापनांना सूट देण्याच्या सूचना  
पदवीधर मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील खासगी आस्थापना, कारखाने, दुकाने, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपींग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स क्षेत्रातील कामगारांना मतदान करण्यासाठी लागणाऱ्या वेळेपुरती कामातुन सवलत द्यावी. वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी योग्य त्या सुविधांची व्यवस्था करण्यात आलेली असल्याचे श्री. चव्हाण यांनी निर्देश दिले आहेत. 

पोलिसांचा तगडा बंदोबस्त 
पदवीधर निवडणूकीच्या अनुषंगाने ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरातील ११४ केंद्रांवर मतदान प्रकिया पार पडणार असून यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह एक हजार ३२५ कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती, विशेष शाखेचे निरीक्षक प्रमोद खटाणे यांनी सोमवारी (ता.३०) दिली. 

११४ बुथवर असा असेल बंदोबस्त 
शहरातील ११४ केंद्रांवर मतदान होणार आहे. प्रत्येक केंद्रावर एक पोलिस कर्मचारी तैनात असणार आहे. तसेच केंद्राच्या शंभर मीटर परिसरात एक कर्मचारी आणि एकाच इमारतीत चार केंद्र आहेत. अशा ठिकाणी एक उपनिरीक्षक, एक कर्मचारी व एक महिला कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. 

हे अधिकारी असतील तैनात 
पोलीस उपायुक्त- ३ 
सहायक पोलीस आयुक्त - ६ 
निरीक्षक- २८ 
एपीआय, पीएसआय- ८२ 
शिपाई- १,१८९ 
महिला शिपाई - ७८ 
राज्य राखीव दलाचे जावान- १०७ 

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Graduate election 813 centers Marathwada