मी मराठी, तू मराठी...मग का करतोस इंग्रजीची नशा 

photo
photo

औरंगाबाद : मी मराठी, तू मराठी... मराठीच आपली मातृभाषा 
मग का बरे करतोय आपणच इंग्रजीची नशा? 
चला जागवूया शुद्ध मराठी, चला टिकवूया शुद्ध मराठी, 
मी मराठी, तू मराठी... मराठीच आपली मातृभाषा या कवितेच्या ओळींनी हजारो नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. कवी संजय झट्टू यांनी ‘मराठी राजभाषा दिना’निमित्ताने मराठी संवर्धनाचा संकल्प करत गुरुवारी (ता. २७) संपूर्ण

शहरभर जनजागृतीही केली. 

शहरातील चौकाचौकात आणि शासकीय ग्रंथालयाच्या मराठी राजभाषादिनाच्या कार्यक्रमात लक्षवेधी फलक हातात घेऊन संजय झट्टू यांनी मराठीचा आग्रह धरा असा प्रचार संदेश दिला. या प्रचाराने उपस्थितांनाही विचार करायला भाग पडले. मराठी लिखाणात बोलण्यात पर्यायाने वाचण्यात, ऐकण्यात असे कितीतरी इंग्रजी शब्द हल्ली आपण पाहत आहोत. 

मराठीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

म्हणूनच संजय झट्टू आणि जगन्नाथ सुपेकर यांनी मराठी कवितेच्या लक्ष वेधून घेणाऱ्या ओळी तयार करून मराठीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शासकीय ग्रंथालयात मराठी राजभाषादिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात संजय झट्टू यांनी हातात लक्षवेधी फलक घेऊन मराठीचा संदेश पोचवला. हा आगळावेगळा संदेश पाहून उपस्थितांनी त्यांच्या उपक्रमाला दाद दिली. त्यानंतर दिवसभर त्यांनी शहरातील विविध चौकात उभे राहून नागरिकांना गोळा करत मराठी भाषेचा आग्रह धरा असा संदेश दिला. 

अशी करतोय आपण थट्टा 

० आज आमच्या पिंट्याचा बर्थडे आहे बरं का! 
० परवा संडेला सोनीची एंगेजमेंट आहे 
० पुढच्या महिन्यात सेकंड वीकला आम्हीच फॅमिली टूरवर आहोत. 
० मी एक्झॅक्टली दहाच्या आत कोर्टात पोचतो. नेक्‍स्ट विकमध्ये मंगळवारी धुळवड आहे. 
० मी मंडेला ऑफ टाकून संडे मॉर्निंगला गावाकडे पोचेल. 

छोट्या-मोठ्या दुकानदार व्यावसायिकांमध्ये हल्ली इंग्रजी शब्दांचा वापर होत आहे. लंच होम, डायनिंग हॉल, प्रभूजी टी स्टॉल, पूर्वीच्या किराणा दुकानाचे आता प्रोव्हिजन स्टोअर्स आणि सुपरशॉपी झाले. केश कर्तनालयाचे सलून झाले, सलूनचे आता जेंट्स पार्लर झाले. आजकल हाय-हॅलो, वेलकम, थँक्स, बाय, गुडमॉर्निंग, गुडनाईट अशा कितीतरी इंग्रजी शब्दांनी मराठी भाषेवर आक्रमण केले आहे. शब्दांची ही घुसखोरी थांबविण्यासाठी आपणच प्रयत्न केला पाहिजे, असा संदेश झट्टू यांनी दिला. 

माफीही मागितली 

विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात माझ्याकडून झालेल्या इंग्रजी शब्दांच्या वापरामुळे मी व्यथित झालो असून, सर्व मराठी भाषकांची मी जाहीर माफी मागत आहे. अशा त्यांच्या मराठी राजभाषादिनाच्या पोस्टरने लक्ष वेधून घेत, विचार करायला नागरिकांना भाग पाडले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com