चोरट्यांनी सहजच लांबवले,  70 तोळे सोने 

अनिल जमधडे
Tuesday, 31 December 2019

पावणेपाच लाखही लंपास

डॉक्‍टर कुटुंब गेले होते मुंबईला 

औरंगाबाद : सिडको एन-4 भागात चोरट्यांनी सेवानिवृत्त शल्य चिकित्सकाचे घर फोडून तब्बल 70 तोळे सोने आणि पावणेपाच लाख रुपये रोख असा एकुण पंधरा लाख रुपयांचा ऐवज पळवून नेला. डॉक्‍टर कुटूंबीय नातीच्या जावळासाठी मुंबईला गेल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी घर साफ केले. 

अमरावती येथून सेवानिवृत्त झालेले शल्यचिकित्सक डॉ. नामदेव गोविंदराव कलवले हे पत्नी चंद्रभागा, मुलगा डॉ. समीर आणि सुनबाई डॉ. सारीका आणि नात अनुष्का असे पाच जणांचे कुटूंब सिडको एन-4 येथे राहतात. त्यांची मुंबई येथील मुलगी सविता थोटवे यांच्या मुलीच्या जावळाचा कार्यक्रम असल्याने संपुर्ण डॉक्‍टर कुटूंबीय शनिवारी (ता. 28) मुंबईला गेले होते. रविवारी (ता. 29) जावळाचा कार्यक्रम झाला, मात्र मुलीच्या अग्रहास्तव कलवले कुटूंबीय मुक्कामी थांबले. 

हेही वाचा - धड होते रेल्वेपटरीवर, शिर मात्र गायब!

सोमवारी चोरी उघड 

सोमवारी (ता. तीस) सकाळी मोलकरीण सखुबाई साळवे या बंगल्याच्या परिसराची साफसफाई करण्यासाठी आणि तुळशीला पाणी टाकण्यासाठी आली, त्यावेळी बंगल्याच्या दरवाजाची ग्रील काढलेली दिसली. त्यामुळे घाबरलेल्या सखुबाई यांनी तातडीने ही माहिती कलवले कुटूंबीयांना दिली. त्यानुसार डॉ. कलवले यांनी औरंगाबदेतील पुतण्या मारोती कलवले यांना माहिती देऊन घरी जाण्यास सांगीतले. तसेच पोलिसांनाही माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळाताच पोलिस निरिक्षक घनशाम सोनवणे यांच्यासह फौजफाटा, गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक मधुकर सावंत व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. 

हृदयद्रावक - आंधळ्या प्रेमाचा असा शेवट : वाचा करुण कहाणी 

ऐवज पळवला 

डॉ. कलवले यांच्या बंगल्याला मुख्य प्रवेशद्वाराचे सेंटर लॉक खराब झालेले असल्याने ग्रीलचे दार ओढून त्याला कुलूप लावले. विशेष म्हणजे घराच्या आतील सर्व खोल्यांचे दार आणि कपाटांना कुलूप लावलेले नव्हते. त्यामुळे चोरट्यांना सहजपणे मुख्य दरवाज्याची ग्रील काढून प्रवेश करता आला. घरात गेल्यानंतर चोरट्यांना कपाटातील सत्तर ते ऐंशी तोळे सोने आणि पावणे पाच लाख रुपये असा एकुण 14 लाख 98 हजार 500 रुपयांचा ऐवज सहजपणे पळवून नेता आला. चंद्रभागा कलवले यांच्या कपाटातील 35 तोळे सोन्याचे दागिने, सुनबाई सारीका यांच्या कपाटातील जवळपास चाळीस हजार रुपयांचे दागिने तसेच कोटच्या खिशातील रोख 72 हजार आणि बेडरुमच्या कपाटातील रोख 4 हजार रुपये असा 14 लाख 98 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी सहजपणे चोरुन नेला. 

पहारेकरी नाही, सुरक्षा अपुरी 

डॉ. नामदेव किलवले यांचा आठ रुमचा दोन मजली बंगला आहे. मुख्य दरवाजाला आतून आणि बाहेरुने असे दोन दरवाजे आहेत. मात्र आतील मुख्य दरवाजाच्या सेंट्रल लॉक झालेले आहे. बाहेरच्या दरवाजाला ग्रील बसवलेली आहे. याच बाहेरच्या दरवाजाला कुलूप लावण्यात आले होते. विशेष म्हणजे घरातील आतील सर्व दरवाजे आणि कपाटांना स्वतंत्र कुलूप लावलेले नव्हते. बाहेर गेटला कुलूप लावून मोलकरणीकडे चावी देण्यात आलेली होती. बंगल्यावर पहारेकरी नव्हता, पहारेकऱ्याने गावी जाण्याचे कारण सांगीतलेले होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 700 gms Gold Looted In Aurangabad