esakal | औरंगाबादेत कोरोना लसीकरणासाठी दिले शंभरावर डॉक्टरांना प्रशिक्षण
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus_vaccine

कोरोनावर जानेवारी महिन्यात लस येण्याची शक्यता असल्यामुळे शासनस्तरावर लसीकरणासाठी जोरदार तयारी केली जात आहे. शनिवारी (ता. १९) शहरातील सुमारे शंभर डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले.

औरंगाबादेत कोरोना लसीकरणासाठी दिले शंभरावर डॉक्टरांना प्रशिक्षण

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोनावर जानेवारी महिन्यात लस येण्याची शक्यता असल्यामुळे शासनस्तरावर लसीकरणासाठी जोरदार तयारी केली जात आहे. शनिवारी (ता. १९) शहरातील सुमारे शंभर डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात महापालिकेसह आयएमए, नीमा या संघटनांचे डॉक्टर्स सहभागी झाले होते. एमजीएम महाविद्यालयात हे प्रशिक्षण पार पडले. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हिलन्स अधिकारी डॉ. सय्यद मुजीब व महापालिकेच्या मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी शंभर डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले.

डॉ.मुजीब यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून लसीकरणाची माहिती देताना सांगितले की, लसीकरणासाठी आरोग्य केंद्र, दवाखाने, शाळा, मंगल कार्यालयांची निवड केली जाणार आहे. एका व्यक्तीला लसीच्या दोन मात्रा २८ दिवसांच्या अंतराने दिल्या जाणार असून, ज्यांना लस घ्यायची आहे, त्यांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर त्यांना मोबाईलवर मेजेस येईल. त्यात लसीकरणाची तारीख, वेळ, ठिकाण याची माहिती असेल. लस देण्याची दिवशी संबंधिताला ओळख पटविण्यासाठी ओळखपत्र दाखवावे लागेल, असे यावेळी सांगण्यात आले. प्रशिक्षणात महापालिकेच्या डॉक्टरांबरोबरच आयएमए, नीमा, होमिओपॅथी डॉक्टर, बालरोग संघटनेचे सदस्य असलेले डॉक्टर्स, फार्मसिस्ट यांना सहभागी करून घेण्यात आले होते असे महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहेमद यांनी सांगितले.


अर्धातास असेल डॉक्टरांचे लक्ष
लसीकरण केलेल्या व्यक्तीवर अर्धातास लक्ष ठेवले जाणार आहे. लसीकरणासाठी तीन खोल्यांची व्यवस्था केली जाणार आहे. पहिली खोली वेटिंगरुम म्हणून वापरली जाईल, दुसऱ्या खोलीत लसीकरण केले जाणार आहे, तर तिसऱ्या खोलीत लसीकरण केलेल्या व्यक्तीवर अर्धा तासापर्यंत लक्ष ठेवले जाणार आहे.

इच्छा नसेल तर नकार देण्याची सुविधा
एखाद्याची लस घेण्याची इच्छा नसेल तर तशी संबंधिताला सुविधा असेल. पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी देखील ही सुविधा असल्याचे डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.

Edited - Ganesh Pitekar