esakal | बिबट्याचे अस्तित्व स्विकारले तर होणार नाही त्रास, संघर्ष टाळाण्याचा वन्यजीवप्रेमींचे मत
sakal

बोलून बातमी शोधा

4Bibtya_0_0

बिबट्या जिथे राहतो त्या भागात तो खाणाखुणा करून ठेवत असतो. त्याला त्याच्या अधिवासातुन पकडून दुसरीकडे दूर नेऊन सोडले तो मार्जार कुळातला आसल्याने तो परत त्याच्या मुळ अधिवासात येतो.

बिबट्याचे अस्तित्व स्विकारले तर होणार नाही त्रास, संघर्ष टाळाण्याचा वन्यजीवप्रेमींचे मत

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : बिबट्या जिथे राहतो त्या भागात तो खाणाखुणा करून ठेवत असतो. त्याला त्याच्या अधिवासातुन पकडून दुसरीकडे दूर नेऊन सोडले तो मार्जार कुळातला आसल्याने तो परत त्याच्या मुळ अधिवासात येतो. तिथे येण्यासाठी अडचणी येत असतील तर मग तो हल्ले करतो. बिबटे आणि माणुस संघर्षाची समस्या वाढण्यापुर्वीच योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. बिबटे मानवी वस्तीजवळ जास्त टोकाचा संघर्ष न करताही राहू शकतात. माणसाने बिबट्यसोबतचे सहजीवन स्विकारले तर एकमेकांना त्रास होणार नाही. यासाठी लोकशिक्षण होण्याची गरज अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.


गेल्या काही दिवासांपासून बिबट्याची अनेक ठिकाणी लोकांनी धास्ती घेतली आहे. पैठण तालूक्यात बिबट्याच्या हल्ल्यात काही दिवसांपुर्वी शेतकरी पिता पुत्राचा मृत्यू झाला. यानंतर सतत कुठे ना कुठे बिबट्या दिसल्याची चर्चा ऐकण्यात येते आणि परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण तयार होते. या पार्श्‍वभुमीवर वन्यजीवांशी संबंधित जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार बिबट्या एकटा राहणारा प्राणी आहे. त्याला त्याचा स्वताचा एक टापू असतो. बिबट्या हा परिस्थितीशी जुळवून घेणारा प्राणी आहे. मानवीवस्तीच्या आसपास गंभीर संघर्षाशिवाय तो राहू शकतो. कुत्रे, रानडुकर, शेळ्या त्याचे आवडते खाद्य आहे.

बिबट विनाकारण त्रास देत नाही - डॉ. किशोर पाठक
वन्यजीवांचे अभ्यासक, प्राणी- पक्षांवर उपचार करणारे डॉ. किशोर पाठक म्हणाले, बिबट हा रात्रींचर तो जंगली असला तरी जंगल तोड, जंगल - डोंगराळ भागात मानवी हस्तक्षेप वाढला. त्यामुळे तृणभक्षी प्राणी कमी झाले,ते नागरी भागाकडे वळले त्यामुळे भक्षाच्या शोधात बिबट्यानेही नागरी भाग जवळ केला आहे. तसा तो माणसाच्या सावलीलाही तो भितो मात्र त्याला जर त्रास होत असेल तरच तो हल्ले करत असतो. मी स्वतः पाटणादेवी, गौताळा परिसरात ९ ते १० वेळा बिबट्याचे दर्शन झाले मात्र विनाकारण तो त्रास देत नाही. शहरात कर्णपुऱ्यात तो एक दीड वर्ष राहिला पण कधी त्याने हल्ले केले नाहीत पण कोणीतरी पाहिले आणि त्याची दहशत निर्माण केली गेली. माणुस त्याचे खाद्य नाही. बिबट्याला त्रास न देता त्याचे आपल्या आजुबाजूला अस्तित्व मान्य केले तर बिबट्या व माणसाचा संघर्ष होणार नाही.

बिबट्यासोबत सहजीवन स्विकारण्याची गरज - अतीन्द्र कट्टी
नांदेडचे मानद वन्यजीव रक्षक अतीन्द्र कट्टी म्हणाले, बिबट एकट्याने राहणारा, अतिशय लाजाळू आणि निशाचर आहे. माणसावर होणारे हल्ले गैरसमजातुन व अपघाताने होतात. माझा चार पाच वेळा बिबट्याशी आमने सामना झाला पण तो शांतपणे निघून गेला. तो माणसाला भक्ष समजत नाही शक्य तो माणसाला टाळतो. खारूताई, पक्षी ते रानडुक्कर, माकड, बकरीपर्यंत काहीही खाऊ शकतो. कुत्रा त्याचे आवडते खाद्य आहे. माणसाची हत्या करणे त्याचा हेतू नसतो त्याला डिवचल्यास माणसाला घाबरवण्यासाठी तो पंजा मारतो. पिकाची नासाडी करणाऱ्या प्राण्यांची संख्या तो नियंत्रणात आणतो. तो शेतकऱ्यांचा एक प्रकारे मित्रच असतो. मानवाने आता बिबट्यसोबत सहजीवन स्विकारले पाहीजे. थोडी शिस्त व थोड्या सवयीत बदल केल्यास हे शक्य होईल.  

काय करावे
० बिबटे आणि मानव संघर्ष टाळण्यासाठी विद्या आत्रेय व अनिरूद्ध बेलसरे यांच्या मानव - बिबट संघर्ष व्यवस्थापन मार्गदर्शक तत्वे या पुस्तकात सूचवले आहे की, लहान मुले बिबट्याच्या तावडीत सापडण्याची शक्यता असल्याने मुलांवर लक्ष असले पाहिजे.
० खाली बसलेली व्यक्ती बिबट्याला आपले भक्ष आहे असे वाटून हल्ला होऊ शकतो यासाठी गावाकडे उघड्यावर जाताना सोबतीला कोणी व्यक्तीला घ्यावे.
० आवाज न करता फिरताना कुत्रा किंवा इतर प्राणी समजून बिबट्या हल्ला करू शकतो यामुळे बिबट असण्याची शक्यता असलेल्या भागात गुणगुणावे, मोठ्याने बोलावे. शेतात पाणी देताना मोठ्याने बोलत रहावे किंवा मोठ्याने गाणे लावावे
० बिबट्याच्या मागे पळू नये किंवा त्याला गराडा घालू नये
० गोठे मजबुत करावेत आणि जनावरे उघड्यावर बांधू नये.
० मोकाट जनावरे, मोकाट कुत्रे दिसल्यावर बिबटया येवु शकतो, यासाठी मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण ठेवावे.

Edited - Ganesh Pitekar