जिथे काम करीत होता तिथेच ट्रकखाली दबून अभियंत्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

चालकाने गोदामाच्या दिशेने ट्रक रिव्हर्स घेतला. त्यावेळी भिंतीजवळ गणेश ढोले उभे होते. ही बाब चालकाच्या लक्षात आली नाही. ट्रकमध्ये क्‍लिनरही नव्हता. त्यामुळे रिव्हर्स घेताना ट्रक व भिंतीच्या कोंडीत सापडून गणेश ढोले गंभीर जखमी झाले.

औरंगाबाद : काही लोकांना गिफ्ट देण्यासाठी एक अभियंता त्यांच्याच देवळाई चौक परिसरातील गोदामाजवळ आला. तिथे सिमेंटने भरलेला ट्रक रिव्हर्स घेतला जात होता. क्‍लिनर नसल्याने चालकाच्या लक्षात आले नाही अन..ट्रक व भिंतीत दबून अभियंता गतप्राण झाला. ही करुण व हृदयद्रावक घटना गुरुवारी (ता. 16) सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडली.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, गणेश तात्याराव ढोले (वय 33, रा. जयभवानीनगर, गल्ली क्रमांक दहा, औरंगाबाद) असे मृत अभियंत्याचे नाव आहे. ते मुळ बीदर, कनार्टक येथील आहेत. ते पत्नी, भाऊ व मुलीसोबत शहरात राहत होते.

हेही वाचा - शाळा बुडवणाऱ्या मुलांच्या मदतीने लागला या बहुचर्चित खुनाचा छडा

गुरुवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कामावर आले. देवळाई चौकातील एका इंग्रजी स्कुलमागे त्यांचे कार्यक्षेत्र असून तेथेच गोदाम आहे. व्यवसायाशी संबंधित काही लोकांना गिफ्ट द्यायचे असल्याने ते या गोदामाजवळ सकाळी आले.

ट्रकमध्ये क्‍लिनरही नव्हता

त्यावेळी गोदामात सिमेंट टाकण्यासाठी ट्रक आला. चालकाने गोदामाच्या दिशेने ट्रक रिव्हर्स घेतला. त्यावेळी भिंतीजवळ गणेश ढोले उभे होते. ही बाब चालकाच्या लक्षात आली नाही. ट्रकमध्ये क्‍लिनरही नव्हता. त्यामुळे रिव्हर्स घेताना ट्रक व भिंतीच्या कोंडीत सापडून गणेश ढोले गंभीर जखमी झाले.

गुंता कायम -  जिल्हा परिषद हातात आली, मात्र आता विरोधात कोण?

अपघात झाल्याचे लक्षात येताच ढोले यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी सव्वाअकरानंतर त्यांना डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. मृत्यूच्या घटनेने ढोल व त्यांच्या मित्र परिवारात हळहळ झाली. एका नाहक चुकीने त्यांचा बळी गेला.

चालकावर गुन्हा 

अपघाताच्या घटनेनंतर सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाहणी करुन पंचनामा केला. गणेश ढोले यांच्या मृत्यूप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accicent on Beed Bypass Deolai Aurangabad News