फाशीची शिक्षा रद्द करून सुनावली जन्मठेपेची शिक्षा

शेखलाल शेख
Wednesday, 23 December 2020

नांदायला येत नसल्याच्या रागातून पतीने गर्भवती पत्नी आणि सासूवर चाकूहल्ला केला होता. यात पत्नीच्या पोटातील अर्भक आणि सासूचा खून केल्याप्रकरणी कृष्णा सीताराम पवार याला जालना सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा रद्द करून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. देबडवार यांनी जन्मठेप सुनावली.

औरंगाबाद : नांदायला येत नसल्याच्या रागातून पतीने गर्भवती पत्नी आणि सासूवर चाकूहल्ला केला होता. यात पत्नीच्या पोटातील अर्भक आणि सासूचा खून केल्याप्रकरणी कृष्णा सीताराम पवार याला जालना सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा रद्द करून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. देबडवार यांनी जन्मठेप सुनावली. तपास अधिकाऱ्यांनी दाखवलेला ढिसाळपणा व असंवेदनशीलतेबद्दल खंडपीठाने नाराजीही व्यक्त केली. तसेच फितूर झालेले चार साक्षीदार शपथ घेऊनही खोटे बोलले असून त्यांच्यावरही कारवाईचे आदेश खंडपीठाने दिले. शिवाय राज्यातील सर्व प्रधान व सत्र जिल्हा न्यायाधीशांनाही या निकालपत्राची माहिती पाठवण्याचे आदेशही दिले.

 

 

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील यावल-पिंपरी तांडा येथील कृष्णा पवार याचे पाच वर्षांपूर्वी ललिताबाई यांच्यासोबत लग्न झाले होते. त्यांना पाच वर्षाचा मुलगा आहे. पत्नी नांदायला येत नाही, या रागातून २४ ऑक्टोबर २०१५ रोजी कृष्णाने भर दुपारी अंबड येथील आंबेडकर चौकात पत्नी ललिता, सासू सुमनबाई आणि मावस सासू अलकाबाई यांच्यावर चाकूने हल्ला केला होता. यात सासु सुमनबाई आणि गर्भवती पत्नीच्या पोटातील अर्भक मरण पावले होते. तर पत्नी आणि मावससासू गंभीर जखमी झाले होते.

 

जालना सत्र न्यायालयाने कृष्णाला दुहेरी खुनाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा ठोठावली तसेच पत्नी आणि मावस सासू यांच्या खुनाचा प्रयत्न केला म्हणून जन्मठेप आणि अर्भकाच्या खुनाच्या आरोपाखाली सात वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी एक हजार रुपये दंड ठोठावला होता. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ३६६ नुसार आरोपीची फाशीची शिक्षा कायम होण्यासाठी शासनाने आणि या शिक्षेविरुद्ध आरोपी कृष्णाने खंडपीठात अपील दाखल केले होते. शासनाच्या वतीने फाशीची शिक्षा कायम होण्यासाठीचे कन्फर्मेशन आणि या शिक्षेविरुद्धचे आरोपींचे अपील यावरील सुनावणी २९ ऑक्टोबररोजी पूर्ण होऊन याचिका निकालासाठी राखून ठेवली होती.

त्यानुसार, याचिकेवर सुनावणी होउन वरील प्रमाणे आदेश देण्यात आले. शासनाच्यावतीने सहायक सरकारी वकील किशोर ठोके पाटील तर आरोपीच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी युक्तिवाद केला. अ‍ॅड. देशमुख यांना अ‍ॅड. गोविंद कुलकर्णी, अ‍ॅड. देवांग देशमुख आणि अ‍ॅड. विशाल चव्हाण यांनी सहकार्य केले.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accused Hanging Punishment Cancelled, Life Imprisonment Aurangabad News