esakal | अतिवृष्टीच्या संकटानंतर आता मोसंबीवर काळ्या डागाचा प्रार्दूभाव, उत्पादक संकटात
sakal

बोलून बातमी शोधा

Mosambi

घराला घरपण अन् चार चौघांत मोठेपणा देणाऱ्या पाचोडसह (ता.पैठण) परिसरातील मोसंबीच्या बागा चार महिन्यांच्या सतत पावसामुळे संकटात सापडल्या आहेत.

अतिवृष्टीच्या संकटानंतर आता मोसंबीवर काळ्या डागाचा प्रार्दूभाव, उत्पादक संकटात

sakal_logo
By
हबीबखान पठाण

पाचोड (जि.औरंगाबाद) : घराला घरपण अन् चार चौघांत मोठेपणा देणाऱ्या पाचोडसह (ता.पैठण) परिसरातील मोसंबीच्या बागा चार महिन्यांच्या सतत पावसामुळे संकटात सापडल्या आहेत. हे संकट सरण्यापूर्वीच 'लाल कोळी'ने फळांवर आक्रमण केला आहे. त्यावर काळे डाग पडल्याने मोसंबी उत्पादक संकटात सापडला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पैठण तालुका मोसंबीचे आगार म्हणून ओळखला जातो. तालुक्यात साडेसात हजार हेक्टरवर मोसंबीची लागवड असून उन्हाळ्यात पाण्याअभावी डोळ्यादेखत सुकणाऱ्या बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी जीवाचा आटापिटा केला.

शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणि उरात भीती; मदतीसाठी सरकारला भाग पाडू, देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन

पाणीटंचाईतून जीवदान देण्यासाठी शेतकऱ्यांनी टॅंकरवर लाखो रुपये खर्च केले. आंब्या बहराने लगडलेल्या बागांना सुरवातीला कवडीमोल भाव मिळाला. आंब्या बहर कमी असल्याने बागा खरेदीची व्यापाऱ्यांत स्पर्धा सुरू होऊन व्यापाऱ्यांनी हिरवे -कच्ची फळे तोडून परदेशात निर्यात केली. मात्र चाळीस टक्के बागा आजही आंब्या फळांनी लगडलेल्या तोडणी अभावी उभ्या आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे दोन वर्षांपासून मोसंबीची वाताहत सुरू आहे. कधी पाणीटंचाई तर कधी अतिवृष्टी त्यामुळे मोसंबी उत्पादक दुहेरी संकटात सापडला आहे. पाणीटंचाईच्या संकटातुन जगलेल्या बागांच्या मुळावर आता आभाळातील पाणी उठले असून या पाण्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे.

चार महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे बागांत पाणी साचल्याने झाडांच्या पांढऱ्या मुळ्या सडून आता झाडे सुकू लागली आहेत. आंब्या बहाराला बऱ्यापैकी भाव मिळाला असताच अतिवृष्टीने बागेत दलदल निर्माण होऊन डासांचे प्रार्दूभाव वाढून फळगळतीस सुरवात झाली आहे. झाडाखाली फळांचा सडा पडल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळते. अतिवृष्टी, फळगळती पाठोपाठ आता अर्धा -अधिक फळावर 'लाल कोळी' चा प्रार्दुभाव होऊन निम्म्या फळांवर काळे डाग पडल्याने व्यापारी ही फळे खरेदीकडे कानाडोळा करीत आहे. चiगले फळ पस्तीस हजार रुपये प्रतिटन तर काळे डाग असलेले फळ दहा ते बारा हजार प्रतिटनाने व्यापारी खरेदी करून मोसंबी उत्पादकांची लुट करीत आहे. काळ्या पडलेल्या फळास व्यापारी "मंगू" आजार म्हणून संबोधित असून मोसंबी उत्पादकांवर एका मागे एक संकटे आल्याने तो नाउमेद झाला आहे.

यासंबंधी मोसंबी उत्पादक कचरू भांड, मनोरखा पठाण, गुलाबराव गहाळ शिवाजीराव भुमरे म्हणाले, प्रारंभापासूनच चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्याने मोसंबी बागेवर मोठ्या प्रमाणात खर्च केला. मृग व आंबा बहारांची फळे लगडली असताना त्यावर लालकोळी पडल्याने व्यापारी या बागा सोडून जात आहेत, तर डासांमुळे फळ गळती सुरू झाली आहे. शेतकरी नेहमीच पाणीटंचाई , अतिवृष्टी, फळगळती व आता काळ्या डागांमूळे पूर्णतः नागवला आहे. एका पाठोपाठ संकटामुळे आता मोसंबीच नको असे वाटु लागले आहे. कृषी विभागाने तातडीने मोसंबी बागेवरील लाल कोळीचा हल्ला रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात. तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाट म्हणाले, शेतकऱ्यांनी गंधक, डब्ल्यू पी किंवा डायकोफॉल विहीत मात्रेत पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी, त्यामुळे मोसंबीवरील लाल कोळीवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल.

संपादन - गणेश पिटेकर