वादळात सापडलेल्या त्या मजुरांसाठी धावले देवदूत आणि थेट सोडले गावापर्यंत 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

पायी जाणारे मजूर वादळी वाऱ्यात सापडले. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिक त्यांच्यासाठी धावून आले. मजुरांना निवारा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या जेवणाची व्यवस्थाही केली. साडेतीनशे मजुरांची तपासणी डॉक्टरांना जागेवरच बोलवून करण्यात आली.

औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे अडकून पडलेले मजुर पायी गावाकडे जात आहेत. बीड बायपास रस्त्याने पायी जाणारे मजूर वादळी वाऱ्यात सापडले. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिक त्यांच्यासाठी धावून आले. मजुरांना निवारा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या जेवणाची व्यवस्थाही केली. साडेतीनशे मजुरांची तपासणी डॉक्टरांना जागेवरच बोलवून करण्यात आली. त्यानंतर स्वखर्चाने या मजुरांना आपल्या गावी पाठविण्यात आले. लोकांच्या आदरातिथ्याने हे परप्रांतीय मजूर अक्षरशः भारावून गेले. 

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांची गेल्या काही दिवसांपासून पायपीट सुरू आहे. शेकडो-हजारो किलोमीटरची पायपीट करत मजूर आपल्या घरी निघालेले आहेत. प्रत्येक रस्त्यावर पायी निघालेल्या मजुरांचे विदारक चित्र दिसत आहे. त्यामुळेच बीड बायपास रोडवरील वन एटी ग्रीन्स सोसायटीतील विवेक धानुका, डॉ. बिपिन मणियार, यतीन जैन, सुनील राजपूत, राज टीपसेटवार, प्रथमेश गायकवाड, सागर राजपूत यांच्यासह परिसरातील दानशूर व्यक्तींनी कमलनयन बजाज हॉस्पिटल समोर जेवण्याची व्यवस्था सुरु केली होती.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी क्लिक करा

रविवारी (ता. १०) रात्री बीड बायपास रस्त्यावरून अनेक मजूर पायी जात होते. यावेळी वादळी पावसाला सुरुवात झाली. मजूर त्रस्त असल्याचे लक्षात येताच पावसात सापडलेल्या मजुरांना येथील श्री. धानुका व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदतीचा हात पुढे केला. ए. एम. पटेल, भावेन अमीन यांनी बांधकाम सुरू असलेली इमारत उपलब्ध करून दिली. या सर्वांनी आचारी लावून मजुरांच्या भोजनाची व्यवस्था केली. 

जागेवरच आरोग्य तपासणी 
मजुरांना आपापल्या गावी पाठविण्यासाठी खुराणा ट्रॅव्हल्सनेही मदतीचा हात देत चार खासगी बस उपलब्ध करून दिल्या. विशेष म्हणजे मजुरांच्या आरोग्य तपासणीसाठी डॉक्टर बिपिन मणियार यांनी पुढाकार घेतला. डॉ. अशोक शेरकर, डॉ. मंजूषा शेरकर, डॉ. बिपिन मणियार, डॉ. शेखर देशमुख, डॉ. प्रफुल्ल जटाळे, डॉ. श्री. एकबोटे या सर्वांनी साथ दिली आणि स्वतःची सर्व कामे बाजूला सारत जागेवर जाऊन सर्व मजुरांच्या तपासण्या करून आरोग्य प्रमाणपत्रही दिले. 

दोन टप्प्यात पाठविले मजुरांना 
खुराणा ट्रॅव्हल्स च्या बसने महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्यांसाठी वाशिम, परभणी, अकोला, नागपूर अशा चार बस पाठवण्यात आल्या तर छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या मजुरांसाठी एसटी महामंडळाचे बोलनी केल्यानंतर महामंडळाने शासनाच्या धोरणानुसार सहा एसटी बस उपलब्ध करून दिल्या. त्यानुसार चार मध्यप्रदेश आणि दोन छत्तीसगड साठी एसटी महामंडळाच्या बस महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत पाठविण्यात आल्या आहेत. मजुरांसाठी राहण्याच्या व्यवस्थेबरोबरच यांची आरोग्य प्रमाणपत्र तयार करणे, प्रवासाची परवानगी घेणे हे सर्व काम श्री. धानुका व त्यांच्या सहकार्याने पूर्ण केले. जवळपास साडेतीनशे मजुरांना आत्तापर्यंत पाठविण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Angels ran for the laborers