औरंगाबादच्या धूत रुग्णालयात डॉक्‍टरांसह कर्मचाऱ्यांवर हल्ला

योेगेश पायघन
बुधवार, 1 जानेवारी 2020

जमावाने केलेल्या हल्ल्यात रुग्णालयातील एक कर्मचारी गंभीर जखमी झाला, तसेच डॉक्‍टरांसह इतर कर्मचारीही जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. घटनेची नोंद एमआयडीसी सिडको पोलीसांत करण्यात आल्याची माहीती रुग्णालयाचे प्रशासक डॉ. हिमांशू गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.

औरंगाबाद : अनोळखी व्यक्तीने डोक्‍याला मार लागलेल्या महिलेला धूत हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी अपघात विभागात सोडून पोबारा केला. रुग्णालयात दाखल होण्यापुर्वीच ती महिला मृत असल्याने रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांशी संपर्क केला. त्यानंतर आलेल्या जमावाने धूत हॉस्पीटलमध्ये तोडफोड करत साडेतीन तास गोंधळ घातला.

यावेळी जमावाने केलेल्या हल्ल्यात रुग्णालयातील एक कर्मचारी गंभीर जखमी झाला, तसेच डॉक्‍टरांसह इतर कर्मचारीही जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. घटनेची नोंद एमआयडीसी सिडको पोलीसांत करण्यात आल्याची माहीती रुग्णालयाचे प्रशासक डॉ. हिमांशू गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा - कॅब, एनआरसीसंदर्भातील आंदोलनाला यापुढे परवानगी नाही

डॉ. हिमांशू गुप्ता यांनी सांगितल्यानुसार, धूत हॉस्पीटलमध्ये मंगळवारी (ता. 31) रात्री पाऊणे दहाच्या सुमारास एका अनोळखीने रिक्षातून 32 वर्षीय महिलेला अपघात विभागात दाखल केले. रुग्णालयातील रुग्णवाहीका चालक, कर्मचारी व डॉक्‍टरांनी प्राथमिक तपासणीला सुरुवात केली. मात्र, महिला आधीच मृत असल्याचे डॉक्‍टरांच्या लक्षात आल्यावर महिलेला दाखल करणाराचा शोध घेण्यात आला. परंतु तत्पुर्वीच रिक्षाचालक व दाखल करणारी व्यक्ती निघून गेली होती. त्यानंतर महिलेजवळ असलेल्या मोबाईलद्वारे नातेवाईकांना संपर्क केला.

हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा-

नातेवाईकांसह मोठा जमाव रुग्णालयात आला. त्यांनी चूक कबुल करा असे म्हणत व्हिडीओ शुटींग करुन हॉस्पिटलमधील सीएमओ डॉ. लोकेश मंत्री, सुरक्षा रक्षक शंकर उचीत, रुग्णवाहिका चालक हनुमंत कोलभुरे, शिफ्ट सुपरवायझर उदय सोनवणे, अंबादास पठाडे, सुनील जाधव, शेख ताजु यांना मारहाण केली. संतप्त जमाव हा आसपासच्या परिसरातील होता. तसेच महिलेला रुग्णालयात आणणाऱ्याची माहीती द्या म्हणत त्यांनी रुग्णालय कर्मचारी डॉक्‍टरांना मारहाण केली. यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल खचल्याची भावना डॉ. गुप्ता यांनी व्यक्त केली.

डॉक्‍टर कर्मचारी व हॉस्पीटल प्रशासनाची चुक नसताना अशी तोडफोड व मारहाण निंदनी आहेच. या घटनेचा सखोल तपास करुन दोषींवर कडक कारवाईची मागणीही धुत रुग्णालयातर्फे करण्यात आली.पत्रकार परिषदेला रुग्णालय संचालक डॉ. विजय बोरगावकर, डॉ. कुलकर्णी आदींसह रुग्णालय प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

नंतर झाला जमाव शांत

हल्ल्याबाबत पोलिस आयुक्तांना माहिती दिल्यानंतर एमआयडीसी सिडको पोलिस पथक रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलीसांच्या मध्यस्थीने सिसीटीव्ही फुटेज जमावाला दाखवण्यात आले. त्यात ती महिला आधीच मृत असल्याचे समजल्याने जमावाने काढता पाय घेतला. त्यानंतर त्या महिलेचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहीतीही डॉ. हिमांशू गुप्ता यांनी दिली.

तसेच मृत महिलेचे नाव वैशाली अरुण सोनवणे (वय 32, रा. सेलगाव, ता. बदनापुर, जि. जालना, ह. मु. संजयनगर) असे असल्याची माहिती एमआयडीसी सिडको पोलिसांनी दिली. या प्रकरणात अद्याप गुन्हा नोंदविण्यात आला नसल्याचेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack on Hospital Staff And Doctors in Aurangabad