जालनेकरांच्या नववर्षाची सुरवात निर्जळीने 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 January 2020

जायकवाडी ते जालना या मुख्य जलवाहिनीवरील पाणी गळती दुरुस्तीसाठी नगरपालिकेकडून गुरुवारपासून (ता.दोन) ते रविवारपर्यंत (ता.पाच) शहरातील पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. 

जालना -  नवीन वर्षाच्या सुरवातीला जालनेकरांना पुढील चार दिवस निर्जळीला तोंड देण्याची वेळ येणार आहे. कारण जायकवाडी ते जालना या मुख्य जलवाहिनीवरील पाणी गळती दुरुस्तीसाठी नगरपालिकेकडून गुरुवारपासून (ता.दोन) ते रविवारपर्यंत (ता.पाच) शहरातील पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. 

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी-जालना या मुख्य जलवाहिनीवर अनेक ठिकाणी पाणी गळती होत आहे. मात्र, काही ठिकाणी पाणी गळतीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे जालना नगरपालिकेकडून या जलवाहिनीवर पाण्याची गळती रोखण्यासाठी गुरवारपासून (ता.दोन) दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

हेही वाचा : जालना झेडपीचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी

चार ठिकाणी दुरुस्तीचे काम
मुख्य जलवाहिनीवरील सुमारे चार ठिकाणी दुरुस्तीचे काम होणार आहे. यात औरंगाबाद-पैठण रोडवरील श्री. पावन गणपती मंदिर, पैठण ते पाचोड रोडवरील जिनिंग कारखान्याजवळील जलवाहिनीवरील होणारी पाण्याची गळती, पैठण-पाचोड रोडवरील मोमीन शेख यांच्या शेताजवळील नादुरुस्त जलवाहिनी आणि पैठण ते पाचोड रोडवरील डाबरवाडी येथील गुलाबबाबा आश्रमशाळा जवळ जलवाहिनीवरील होणारी पाणी गळती रोखण्यासाठी जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम होणार आहे. परिणामी जायकवाडी येथून होणारा पाणीपुरवठा गुरुवारपासून रविवारपर्यंत बंद करण्यात येणार आहे.

हेही वाचा : नवं वर्ष उमेदीचं...

पाण्याचा वापर करावा जपून 
जालना शहरात पुढील चार दिवस निर्जळी राहणार आहे. यात प्रामुख्याने जुना जालना, नूतन वसाहत, मस्तगड, संजयनगर, चंदनझिरा आदी भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. 

हेही वाचा : क्राईम सिरियल पाहून जुन्या प्रियकराने काढला काटा 

शहरांतर्गत पाणी गळती थांबेना 
शहरांतर्गत जलवाहिन्यांवर पाण्याची मोठी गळती होत आहे. विशेष म्हणजे मागील पंधरा ते वीस दिवसांपासून मोतीबाग परिसरात जलवाहिनीला मोठ भगदाड पडले आहे. त्यामुळे रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. मात्र याकडे नगरपालिका लक्ष देण्यास तयार नाही. 

जायकवाडी-जालना या जलवाहिनीवर ठिकठिकाणी होत असलेली पाण्याची गळती रोखण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे जुना जालना भागाला ता. पाच जानेवारीपर्यंत पाणीपुरवठा होणार नाही. नगरपालिकेला सहकार्य करावे. 
संगीता गोरंट्याल, नगराध्यक्षा, जालना 

जालना-जायकवाडी योजनेला आता सहा ते सात वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी अंतर्गत गळती होत आहे. तसेच उन्हाळ्यात जलवाहिनीवर पाण्याची गळती होणार नाही, यासाठी पाणी गळतीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. 
राजेश बगळे, 
पाणीपुरवठा अधिकारी, पालिका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water supply close for four days in Jalna