
दहेगाव बंगल्याजवळ कंटेनर उभा होता. या उभ्या कंटेनरला रिफ्लेक्टर किंवा कंटेनर नादुरुस्त असल्याचा काहीच दिशादर्शक फलक नव्हते.
वाळूज (जि.औरंगाबाद) : जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेऊन नागपूरकडे भरधाव जाणाऱ्या भाविकांची मिनी बस रस्त्यावर उभ्या नादुरुस्त कंटेनरला धडकली. या अपघातात बस अर्धी कापली गेल्याने ११ जण जखमी झाले. त्यातील तीन जण गंभीर आहेत. हा भीषण अपघात औरंगाबाद-पुणे महामार्गावरील दहेगाव (बंगला) येथे शुक्रवारी (ता.पाच) पहाटे तीनच्या सुमारास झाला.
नागपूर येथील हर्षदा ठाकरे (१०), बंडू ठाकरे (४१), रामभाऊ ठाकरे (७५), स्नेहा गावंडे (३०), अश्विन गावंडे (४०), माधव गावंडे (५०), विकास म्हस्के (५०) असे १२ भाविक जेजुरीहून खंडेरायाचे दर्शन घेऊन मिनी बसमधून (एमएच-४९ जे, ०६३४) परत नागपूरकडे जात होते. त्यांची बस औरंगाबाद-पुणे महामार्गावरील दहेगाव (बंगला) जवळ येताच रोडवरच उभ्या असलेल्या कंटेनरला (एमएच-४०, बीजी-६६७७) पाठीमागून जोरात धडकली.
या अपघातात बस कंटेनरमध्ये घुसली. त्यामुळे ती अर्धी कापली गेली. या अपघातात हर्षदा ठाकरे, बंडू ठाकरे, रामभाऊ ठाकरे, स्नेहा गावंडे, अश्विन गावंडे, माधव गावंडे, विकास म्हस्के जखमी झाले. उर्वरित किरकोळ जखमी आहे. जखमींना पोलिस व नागरिकांनी बाहेर काढून उपचारार्थ दाखल केले. जखमींवर घाटीत उपचार सुरू आहेत.
आणखी वाचा औरंगाबादच्या बातम्या
या प्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. दहेगाव बंगल्याजवळ कंटेनर उभा होता. या उभ्या कंटेनरला रिफ्लेक्टर किंवा कंटेनर नादुरुस्त असल्याचा काहीच दिशादर्शक फलक नव्हते. शिवाय पहाटेची वेळ होती. भरधाव असलेल्या मिनी बस चालकाला अंदाज न आल्याने बस त्या कंटेनरला धडकून हा भीषण अपघात झाला.
Edited - Ganesh Pitekar