भाकरीसाठी वृद्धाचा गेला जीव, भरधाव ट्रकने दिली धडक

सुषेन जाधव
Monday, 1 February 2021

वसंत अंभोरे रविवारी दुपारी सायकलवरून पाणी घेऊन घराकडे निघाले. दिशानगरीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत फुटलेल्या दुभाजकावरून त्यांनी अर्धा रस्ता ओलांडला देखील.

औरंगाबाद : भाकरीचा चंद्र शोधता शोधता आयुष्याने साठी गाठली, बुलढाण्यावरुन औरंगाबादेत येऊन सुरक्षारक्षकाची नोकरी करत करत पोटाची खळगी भरणाऱ्या ६० वर्षीय वृद्धाला पाणी आणण्यासाठी जाताना भरधाव ट्रकने धडक दिली. यात वृद्ध जागीच गतप्राण झाल्याची घटना रविवारी (ता.३१) दुपारी पावणे दोनच्या सुमारास दिशा नगरी, बीड बायपास परिसरात घडली.

वसंत रामभाऊ अंभोरे (६०, रा. वडाळी, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा, ह.मु. दिशानगरी, सातारा परिसर) असे ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. अंभोरे हे दिशानगरी परिसरात सायकलवर पाणी घेऊन रस्ता ओलांडत असताना भरधाव ट्रकने त्यांना चिरडले. विशेष म्हणजे मागील सात दिवसांत तीन अपघातांत चार बळी गेले असून तिन्ही अपघात ट्रकमुळे झाले आहेत.

अर्धा रस्ता पार केला, अन्...
वसंत अंभोरे रविवारी दुपारी सायकलवरून पाणी घेऊन घराकडे निघाले. दिशानगरीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत फुटलेल्या दुभाजकावरून त्यांनी अर्धा रस्ता ओलांडला देखील. परंतु, संग्रामनगर उड्डाणपुलाकडून महानुभाव आश्रम चौकाकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने (क्र. एमएच १२, एमव्ही २०९८) अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलेल्या अंभोरे यांना उडविले. रस्त्यावर कोसळलेले अंभोरे ट्रकच्या पुढील चाकाखाली चिरडले गेले. या भीषण अपघातात त्यांचा जागीच जीव गेला.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

१२ वर्षापासून औरंगाबादेत वास्तव्य
-पत्नी, मुलगा आणि मुलगी या कुटुंबीयांसह ते दहा ते बारा वर्षांपासून औरंगाबादेत राहत होते. दिशानगरी परिसरातील एका खासगी रुग्णालयात ते सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होते. सातारा परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने बायपासने गेलेल्या एमआयडीसीच्या पाइपलाइनच्या वॉल्व्हला गळती असल्याने या परिसरातील नागरिक तेथूनच पाणी घेऊन जातात. अंभोरे हे सुध्दा येथून आपल्या घरी पाणा घेऊन चालले होते. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. बायपासच्या बाजूला असलेल्या मैदानावर वसलेल्या झोपडपट्टीतील नागरिकांचीही भिस्त या पाण्यावर आहे. त्यांना जीव धोक्यात घालून बायपास ओलांडावा लागतो. महिलांना तर डोक्यावर एक, कंबरेवर एक असे दोन हंडे घेऊन हा मृत्यूमार्ग ओलांडावा लागतो.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Accident News Elederly Person Died In Truck Accident