रेल्वेपाठोपाठ विमानतळावरही आता कोरोना चाचणी, औरंगाबादेत पथक तैनात  

माधव इतबारे
Tuesday, 24 November 2020

खबरदारी :  महापालिकेचे पथक राहणार तैनात 

औरंगाबाद : दिल्लीत कोरोना संसर्ग वाढल्यामुळे खबरदारी म्हणून, सचखंड एक्सप्रेसने शहरात येणाऱ्या प्रवाशांची रेल्वेस्टेशन कोरोना चाचण्या करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यापाठोपाठ आता विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी मंगळवारपासून (ता. २४) केली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेचे पथक विमानतळावर तैनात केले जाणार असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

शहरात आठवडाभरापूर्वी कोरोनाबाबतचे चित्र दिलासादायक होते. मात्र दिवाळी सणाच्या खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने आता रुग्ण वाढत आहेत. दरम्यान दिल्लीत कोरोनाचा कहर अचानक वाढला आहे. दिल्लीतून संसर्ग वाढू नये म्हणून, दिल्ली व इतर राज्यातून विमानाने शहरात येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावरच कोरोना चाचणी करून त्यांना शहरात प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी विमानतळावर पथक तैनात केले जाणार आहे. चाचणी झाल्याशिवाय प्रवाशांना विमाततळाबाहेर पडू दिले जाणार नाही, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

२७३ प्रवाशांचे नमुने घेतले 
सचखंड एक्स्प्रेसने प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यासाठी रेल्वेस्टेशनवर महापालिकेने दोन पथके तैनात केली आहे. पथकाने सोमवारी २७३ प्रवाशांची कोरोना चाचणी केली. यातील १०५ प्रवाशांची अ‍ॅण्टिजेन चाचणी करण्यात आली असून त्यातील एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला नाही. १६८ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. या प्रवाशांचे स्वॅब घेण्यात आले असून त्याचा अहवाल मंगळवारी (ता.२४) प्राप्त होणार असल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(Edited By Pratap Awachar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad airport corona test start Squads deployed airport