औरंगाबाद शहरावर आता सातशे 'सीसीटीव्ही'ची नजर !  

माधव इतबारे
Thursday, 24 September 2020

कमांड कंट्रोल रूमचे काम पूर्णत्वाकडे; तीनशे पोल राहिले उभे 

औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेतील एमएसआयचे काम लॉकडाउनमुळे रखडले होते. ही कामे आता युद्धपातळीवर सुरू असून, डिसेंबरअखेर शहरावर सुमारे ७०० सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे. त्यासाठी ४९१ पोल उभे केले जाणार आहेत. आतापर्यंत ३०० पोल उभे राहिले आहेत. कमांड कंट्रोल रूमचे काम पूर्णत्वाकडे आहे, अशी माहिती बुधवारी (ता. २३) देण्यात आली. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

स्मार्ट सिटी योजनेतील अनेक कामांना लॉकडाउनचा फटका बसला. त्यामुळे नुकत्याच जाहीर झालेल्या रॅकिंगमध्ये औरंगाबादचा क्रमांक घसरला. दरम्यान लॉकडाउनमधून शिथिलता मिळाल्यानंतर स्मार्ट सिटी योजनेतील कामांना गती मिळाली आहे. यासंदर्भात बुधवारी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर स्नेहा बक्षी, इम्रान खान, स्नेहा नायर आणि प्रतीक मानवतकर यांनी माहिती दिली. स्नेहा नायर यांनी एमएसआयच्या (मास्टर सिस्टिम इंटिग्रेटर) कामांबाबत सांगितले की, हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने शहर स्मार्ट होणार आहे. डिसेंबरअखेर कामे पूर्ण होतील. सातशे सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. सहाशे कॅमेरे फिक्स स्वरूपाचे, तर शंभर कॅमेरे फिरते असतील. त्यासाठी ४९१ खांब उभे केले जात आहेत. आतापर्यंत तीनशे खांबांची उभारणी झाली आहे. १४ पोलिस ठाणे सीसीटीव्ही कॅमेऱ्याशी जोडले जाणार आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यात महापालिका क्षेत्राबाहेर असलेल्या वाळूज आणि वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचा समावेश आहे. दोन कंट्रोल रूम असून, पोलिस आयुक्तालयातील कमांड कंट्रोल सेंटरचे काम पूर्णत्वाकडे आहे. स्मार्ट सिटीच्या कार्यालयातील काम लवकरच पूर्ण होईल. पन्नास डिजिटल डिस्प्ले बोर्ड लावले जाणार आहेत, दोन बोर्ड रेल्वेस्टेशन येथे उभारण्यात आले आहेत. बायोमेट्रिक हजेरी, व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम, सिटी बससाठी ई-तिकिटिंग आणि स्मार्ट कार्ड ही कामे लवकरच पूर्ण होतील, असे नायर यांनी सांगितले. 

संरक्षण भिंतीचे काम वर्षभरात होणार 
स्मार्ट सिटी योजनेतून सफारी पार्कचे काम केले जात आहे. यातील संरक्षण भिंत बांधण्याच्या पहिल्या टप्प्याच्या कामाची निविदा आठवडाभरात निघेल, असे इम्रान खान यांनी सांगितले. ही निविदा पंधरा ते वीस कोटींच्या खर्चाची असेल. वर्षभरात हे काम पूर्ण होईल. दुसऱ्या टप्प्याची निविदा प्रक्रिया केली जाणार आहे. त्यात अंतर्गत पायाभूत सुविधा, इमारतींचे बांधकाम यासह इतर कामे असतील, तर तिसऱ्या टप्प्यात प्राण्यांसाठी पिंजरे तयार करणे व त्याअनुषंगाने आवश्यक असलेली कामे आहेत. 
 
ऐतिहासिक दरवाजे उजळणार 
स्नेहा बक्षी यांनी सांगितले की, शहरातील ऐतिहासिक नौबत दरवाजा, खिजरी दरवाजा, काला दरवाजा, बारापुल्ला गेट, कटकट दरवाजा, पैठणगेट, रोषणगेट आणि महेमूद दरवाजा या नऊ दरवाजांच्या संवर्धनाचे व सुशोभीकरणाचे काम स्मार्ट सिटीच्या माध्यमातून केले जाणार आहे. तीन दरवाजांची कामे मंगळवारपासून (ता.२२) सुरू झाली. महेमूद दरवाजाच्या कामाची फेरनिविदा काढण्यात आली आहे. कोरोना काळात स्मार्ट सिटी योजनेतून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती प्रतीक मानवतकर यांनी दिली. यावेळी जनसंपर्क विभागाच्या अर्पिता शरद यांचीही उपस्थिती होती. 

(Edit- Pratap Awachar)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad city end of December CCTV Watch