
शासनाने २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शहरातील शिक्षकांनीही शाळेत जाण्यापूर्वी कोरोना चाचणी करून घेतली.
औरंगाबाद : शासनाने २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शहरातील शिक्षकांनीही शाळेत जाण्यापूर्वी कोरोना चाचणी करून घेतली. मात्र, शहरात शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर पडला. आता प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आजपासून ११ वी व १२ वीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शिक्षकांनी यापूर्वी चाचणी केली असली तरी आता पुन्हा त्यांना नव्याने चाचणी करावी लागेल, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या असल्या तरी महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी तीन जानेवारीपर्यंत शाळा सुरु न करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, त्यांनी १५ डिसेंबरपासून अकरावी आणि बारावीच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय सोमवारी (ता. १५) घेतला आहे. त्यानुसार आजपासून अकरावी व बारावीचे वर्ग सुरु झाले. शाळेत जाण्यापूर्वी शिक्षकांना पुन्हा कोरोना चाचणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
यापूर्वी २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरु होणार म्हणून शिक्षकांनी आरटीपीसीआर चाचण्या केल्या होत्या. त्यामुळे पुन्हा चाचणी करायची का? असा प्रश्न शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे केला जात आहे. या संदर्भात विचारणा केली असता, महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, शिक्षकांना आता पुन्हा कोरोना चाचणी करावीच लागेल. यापूर्वी चाचणी केली असली तरी तो अहवाल फक्त सात दिवसांपर्यंत ग्राह्य धरला जातो. चाचणीसाठी शहरात सोळा ठिकाणे असून, त्या ठिकाणी शिक्षक चाचणी करून घेऊ शकतात.
चोवीस तास सुरु असणारे केंद्र
-एमआयटी मुलींचे वसतिगृह, सातारा परिसर
-अग्निशमन विभाग पदमपुरा
-समाज कल्याण मुलांचे वसतिगृह, किलेअर्क
-एमजीएम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
-सिपेट, चिकलठाणा औद्योगिक वसाहत
सकाळी दहा ते सायंकाळी
सहा वाजेपर्यंतचे चाचणी केंद्र
-आरोग्य केंद्र बायजीपुरा
-तापडिया मैदान, अदालत रोड
-रिलायन्स मॉल , गारखेडा
-महापालिका केंद्र, सिडको एन ११
-आरोग्य केंद्र, राजनगर
-सिडको एन-२ कम्युनिटी सेंटर
-महापालिका आरोग्य केंद्र, हर्षनगर
-महापालिका आरोग्य केंद्र, चिकलठाणा
-महापालिका रुग्णालय, सिडको एन ८
-महापालिका आरोग्य केंद्र, शिवाजीनगर
-छावणी परिषद रुग्णालय
Edited - Ganesh Pitekar