मुलगी पाहिली, पसंती झाली, अचानक म्हणे हूंडाच द्या !

सुषेन जाधव
Tuesday, 22 September 2020

मुलीच्या डोळ्यात दोष असल्याचे सांगत मोडले लग्नः मुलाकडच्या मंडळींविरोधात गुन्हा

औरंगाबाद : वधू-वर परिचय मेळाव्यात मुलीला पाहिलं, पसंतही केलं, एकमेकांच्या घरी जाऊन विवाह ठरविला. साखरपूडा पारही पडला, त्याच वेळेस नवरा मुलाकडच्या मंडळींनी १५ लाख रुपये हूंडा मागितला, इतकेच नव्हे तर हूंड्याला नकार देताच मुलीच्या डोळ्यात दोष असल्याचे सांगून विवाह मोडल्याचा प्रकार समोर आला.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुलीकडच्या मंडळींनी वारंवार विनंती करुनही लग्नासाठी तयारी न दाखविल्याने नवरीकडील मंडळींनी शेवटी पोलिसांत धाव घेतली, दरम्यान हूंड्यासाठी लग्न मोडल्याच्या प्रकरणात बेगमपुरा पोलिस ठाण्यात सोमवरी (ता.२१) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

तक्रारीवरुन सागर लिलाधर दाते (नवरदेव), लिलाधर दाते, चंचला दाते, अजय दाते, अंकिता दाते, डॉ. अशोक धर्माळ, सपना वारखेडे, विशाल वानखेडे, प्रितमा काळपांडे, गजानन काळपांडे अशी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मिळालेल्या माहितीनुसार, रमाकांत सुरवसे (नाव बदललेले आहे, रा.पहाडसिंगपुरा) हे एका कंपनीत काम करतात. ११ व १२ जानेवारी रोजी बुलढाणा येथे पार पडलेल्या वधू-वर परिचय मेळाव्यात ते नातेवाईकांसह मुलीला स्थळ शोधण्यासाठी सहभागी झाले होते. तेथे सुरवसे यांची डॉ. अशोक धर्माळ यांची भेट झाली. त्यांनी प्राथमिक चौकशी करून परिचय करून दिला. त्यानंतर २४ जानेवारीला लिलाधर दाते याचा सुरवसेंना फोन आला. त्याने धर्माळचा दाखला देत मुलाला घेऊन ३ फेब्रुवारीला मुलीला पाहण्यासाठी येऊ, असे सांगितले. परंतू ते पाहण्यास गेलेच नाही. त्यानंतर १२ फेब्रुवारीला डॉ. धर्माळसह लिलाधर दाते, चंचला दाते, सागर, अजय, अंकिता दाते हे सर्वजण मुलीला पाहण्यासाठी आले. पाहण्याचा कार्यक्रम झाल्यावर जेवण करून ते माघारी गेले. त्यांनी १४ फेब्रुवारीला मुलगी पसंत असल्याचे सांगितले आणि मुलाचे घर पाहण्यासाठी या, असा निरोप दिला. १६ फेब्रुवारीला सुरवसे हे त्यांचे सासरे, साडू तसेच इतर नातेवाईकांसह मुलाच्या घरी गेले. सर्व पसंती कळविल्यानंतर १ मार्चला साखरपुडा ठरला. तत्पूर्वी मुलाने मुलीशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली. २२ फेब्रुवारीला तो मित्रासह औरंगाबादेत आला. घरीच तासभर त्याने मुलीशी चर्चा केली. एकमेकांना पसंत असल्याचे ठरले.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अचानक केली हूंड्याची मागणी

१ मार्चला सर्व दाते कुटूंब आणि सपना वानखेडे, विशाल वानखेडे, राजराम भळ, गजानन काळपांडे, प्रितमा काळपांडे, सागरचे मित्र प्रविण खरात, प्रदीप शिंदे, मंगेश होनाळे असे अनेकजण साखरपुड्याला आले. व्यवस्थितपणे हा कार्यक्रम पार पडला. १७ मे ही लग्नाची तिथी ठरली. त्यानंतर गजानन काळपांडे आणि लिलाधर दाते यांनी सुरवसे यांच्याशी एकांतात बोलून अचानक १५ लाख रुपये हुंड्याची मागणी केली. हुंड्याला नकार देताच त्यांनी मुलीचा एक डोळा लहान आहे. त्यात दोष आहे, असे कारण सांगून लग्नाला स्पष्टपणे नकार कळविला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार शिंबरे हे करत आहेत.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad crime news Marriage has broken without dowry