खोटी तक्रार करून मिळवली हरवलेली रक्कम; दारूच्या नशेत हरवली होती बॅग

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 12 January 2021

पुंडलिकनगर पोलिसांची सतर्कता, तातडीने तपासचक्र फिरवल्याने प्रकरण चव्हाट्यावर

औरंगाबाद: पुंडलिकनगर ठाण्याच्या हद्दीतील एका उद्यानातून 75 हजार रोख असलेली बॅग लंबविल्याची तक्रार एका तरुणाने केली़ या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवून वस्तूस्थिती पडताळली असता तरुणाने दिलेली तक्रार ही खोटी असल्याचे समोर आले. हा प्रकार मंगळवारी (ता.12) दुपारी साडे बाराच्या सुमारास घडला.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन बबन मस्के (20, रा. सावरगाव मस्के, ता. जाफ्रबाद, जालना) या तरुणाने पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात येऊन माहिती दिली की, तो एन - 4 येथील दर्पण उद्यानात येथे गेला होता. त्याला झोप लागली असता चोरट्यांनी त्याच्या उशाशी 75 हजार रोख रक्कम ठेवलेली बॅग अज्ञात चोरट्याने लांबविली. 75 हजाराची रक्कम चोरीला गेल्याचे ऐकताच सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी तातडीने घटनास्थळावर पथक पाठविले.

'रस्ता नाही तर मतदान नाही'; थेरगावातील शेकडो नागरिकांचा मतदानावर बहिष्कार

पथकाने परिसर पिंजून काढण्यासह या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता उद्यानात प्रवेश करतांना आणि रस्त्याने जातांना तरुणाकडे कोणतेही बॅग नसल्याचे दिसून आले. तरुण रक्कम चोरीला गेल्याचा बनाव करत असल्याने पोलिसांनी त्याची उलट तपासणी केली. शिवाय तो कोठून आला कोणत्या ठिकाणांवर थांबला याची संपूर्ण माहिती जाणूण घेतली. पोलिस आपली उलट तपासणी करत असल्याचे लक्षात येताच भांबवलेल्या तरुणाने उडवाउडविची उत्तरे देण्यास सुरवात केली.
 
आमदार दानवेंच्या पीएचा कॉल?
आपली उलट तपासणी होत असल्याचे लक्षात येताच तरुणाने त्याचा मोबाईल पोलीस अधिकाऱ्याला दिला, पलीकडून मोबाईलवर बोलणाऱ्या व्यक्तीने आपण भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांचा पीए गव्हाणे बोलत असल्याचे सांगितले. तसेच तातडीने त्याची बॅग शोधा त्याला त्रास देऊ नका असे फरमान सोडले. नंतर एपीआय सोनवणे यांनी खात्री केली असता आमदार संतोष दानवे यांचा पीए त्यांना बोललाच नसल्याचे समोर आले. पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे आणि त्याच्या टीमने तपास केल्यानंतर सचिन मस्के या तरुणाने त्याची बॅग ही करमाड येथील येथील एका बारमध्ये विसरल्याचे समोर आले, पोलिसांनी बार मालकाशी संपर्क केला असता, ती बॅग जशीच्या तशीच उचलून ठेवल्याचे बार मालकाने सांगितले.

RBI चा राज्यातील आणखी एका बँकेला दणका! परवाना रद्द केल्याने ठेवीदारांमध्ये खळबळ

मी नशेत होतो म्हणून-
सदर बॅग ही करमाड येथील बारमध्ये विसरल्याचे समोर आल्यानंतर तरूणाने पुंडलिकनगर पोलिसांची माफी मागत आपण नशेत असल्याने बॅग कोठे ठेवली हे विसरलो होतो, त्यामुळे बनाव केल्याची कबूली देत पोलिसांची माफी मागितली.

(edited by- pramod sarawale)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad crime news police caught Lost money gained