पैसे न दिल्याने जावयाची सासऱ्याला मारहाण, वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

सुषेन जाधव
Friday, 22 January 2021

घर बांधण्यासाठी सासऱ्याकडे पैशांची मागणी केली. पण, त्यांनी ते दिले नाही.

औरंगाबाद : घर बांधण्यासाठी सासऱ्याकडे पैशांची मागणी केली. पण, त्यांनी ते दिले नाही. त्यामुळे सासऱ्यास शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना बुधवारी (ता.२०) सकाळी साडेआठच्या सुमारास घाणेगाव, संघर्षनगर येथे घडली. भैय्यासाहेब शेषराव जाधव (३५, रा. घाणेगाव, संघर्षनगर) असे मारहाण केलेल्या जावयाचे नाव आहे. रामनाथ कचरू रावडे (६७) हे बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास नळाचे पाणी भरत होते.

हृदयविकाराच्या झटक्याने जवानास वीरमरण, देशसेवेसाठी सेवाकाळ घेतला होता वाढवून

त्यावेळी जावई जाधव तेथे आला. त्याने मला घराचे उर्वरित बांधकाम करायचे आहे. त्यासाठी मला पैसे द्या अशी मागणी करून जाधवने रावडे व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करून कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी 
भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला. हा अपघात रविवारी (ता. १७) रात्री साडेअकराच्या सुमारास पडेगाव कचरा डेपोजवळ झाला. शेख शाहेद शेख अब्दुल माजीद (२८, रा. आसेफिया कॉलनी, टाऊन हॉल) हे दुचाकीने (एमएच १४ क्यूबी ४४०१) घराकडे पडेगावहून निघाले होते. त्यावेळी पडेगावातील कचरा डेपोजवळ त्यांना पाठीमागून आलेल्या कार (एमएच २० एजी ३६२९) चालकाने धडक दिली. या अपघातात शेख शाहेद यांच्या पायाचे हाड मोडले; तसेच उजव्या पायाच्या मनगटाला जबर मार लागला. तर शेख सोबत असलेल्या आसेफ यांनाही जबर दुखापत झाली. अपघातानंतर कार चालकाने धूम ठोकली. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ग्रामपंचायतला पडली 'बारा' मते... मग पठ्ठ्याने बॅनर लावून मानले मतदारांचे 'जाहीर आभार'

कारमधून पैशाची बॅग लंपास 
वायू दलातील सैनिकाच्या कारचा दरवाजा उघडून त्यातील कागदपत्रे व रोख एक हजाराची रोकड चोराने लंपास केली. ही घटना बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास सातारा परिसरातील शीतलनगरात घडली. शिवकुमार नरसिंग सदानंदे (२९, रा. शिवसदन, संत रविदासनगर, उदगीर) यांनी मित्राच्या घरासमोर कार (एमएच २० डीव्ही ५०८५) उभी केली होती. दुपारी साडेचारच्या सुमारास चोराने त्यांच्या कारचा दरवाजा उघडून बॅगसह त्यातील वायू दलाचे ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड व रोख एक हजार असा ऐवज लंपास केला. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Crime News Son In Law Beaten Father In Law