
नातेवाईकाच्या दशक्रियाविधीसाठी शिवराई (ता. वैजापूर) येथे गेलेल्या जमादारासह भाडेकरुचे भरदिवसा घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड लांबविण्यात आली. प्लॉट क्र. ७, गट क्र. १६९, उज्वलाताई शाळेजवळ, सातारा परिसरात ही घटना घडली असून शनिवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली.
औरंगाबाद : नातेवाईकाच्या दशक्रियाविधीसाठी शिवराई (ता. वैजापूर) येथे गेलेल्या जमादारासह भाडेकरुचे भरदिवसा घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड लांबविण्यात आली. ही घटना शनिवारी (ता.७) सायंकाळी पाचच्या सुमारास आकाश विहार, प्लॉट क्र. ७, गट क्र. १६९, उज्वलाताई शाळेजवळ, सातारा परिसरात उघडकीस आली. माहिती मिळाल्यानंतर सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जमादाराच्या घरामागे सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणावरील मजूरांनी घर फोडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
हायकोर्ट सुरक्षेसाठी कार्यरत असलेले संभाजी रायभान डिके हे कुटुंबियांसह शनिवारी (ता.सात)सकाळी आठच्या सुमारास गेले होते. त्यांच्या घराच्या पाठीमागे एका सोसायटीचे बांधकाम सध्या सुरू आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास जमादार डिके कुटुंबियांसह घरी परतले. त्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप उघडले असताना त्यांना कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यामुळे चोरी झाल्याचा त्यांना संशय आला.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
त्यावेळी कपाटातील अडीच तोळ्याचे मिनी गंठण, लहान मुलांचे सोन्या-चांदीचे दोन जोड, चेन आणि ३८ हजाराची रोकड तसेच भाडेकरु लखींदर साहू यांच्या पँटच्या खिशातील दोन हजाराची रोख असा ऐवज गेल्याचे समोर आले. डिके यांच्या घराचा पाठीमागील पत्रा वाकवून कंपाऊंड वॉलवरुन आत उडी घेत चोरट्यांनी ही चोरी केली. सुरूवातीला भाडेकरुच्या खोलीचे कुलूप तोडले.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
तेथून आत शिरल्यावर जिन्यात असलेल्या कुदळच्या सहाय्याने भाडेकरु व डिके यांच्या खोलीचा सामायिक दरवाजा फोडला. तेथून डिके यांच्या बेडरुममध्ये शिरुन कपाटातील दागिने व रोख लांबवल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळाल्यावर पाऊण तासाने सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
( संपादन- प्रताप अवचार)