ती नगरहून फक्त या गोष्टीसाठी येत होती औरंगाबादेत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 January 2020

  • डॉक्‍टरच्या घरी घरफोडी करणाऱ्या दोघी अटकेत
  • तीन तरुणांकडूनही घरफोड्यांची उकल 
  • अल्पवयीन दोघे ताब्यात, उस्मानपूरा पोलिसांची कारवाई 

औरंगाबाद : एरवी घरफोड्यांचे सत्र सुरुच असते. पोलिस येतात अन..चोर पकडतात. पण साहाजिकच महिला घरफोडी करतील असं कुणालाही वाटणार नाही. पण ही बाब औरंगाबादेत समोर आली. दोघींनी मिळून एका डॉक्‍टरकडे घरफोडी केली. घरफोडीसाठी एक तर चक्क नगरहून यायची व काम झाल्यानंतर निघून जायची, अशी बाब पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. या दोघींना व इतर तीन तरुणांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

संशयित दोन महिलांना उस्मानपुरा पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्या सध्या पोलिस कोठडीत आहेत. त्यांनी एका अल्पवयीन मुलाला हाताशी धरुन डॉ. 
सविता उबाळे (रा. श्रेयनगर, औरंगाबाद) यांचे घर फोडले होते. त्यांना अटक झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून अडीच तोळे सोने, तांबे व पितळी, स्टिलची भांडी, साड्या असा एक लाख वीस हजारांचा ऐवज जप्त केला.

हेही वाचा : मराठा क्रांती मोर्चाचे जोडे मारो आंदोलन  

याशिवाय अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षाही ताब्यात घेण्यात आली. उस्मानपुरा ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक कल्याण शेळके यांनी सांगितले की, दोघींपैकी एक नगरहून केवळ घरफोडी करण्यासाठी येत होती. या दोघींनी यापूर्वी एमआयडीसी सिडको व सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या केल्या आहेत.

पोलिसांनी घरफोडी प्रकरणी आणखी तिघांनाही अटक केली. शेख अफरोज उर्फ राज शेख गुलाब शेख (वय 19), मजहर शेख गुलाब (वय20), शेख अली शेख सत्तार पठाण (वय 19, रा. तिघे काबरानगर, गारखेडा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यासोबतही एक अल्पवयीन मुलाला विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा : राजमुद्रा टाळा, अन्यथा शिवप्रेमींमध्ये असंतोष

या सर्वांकडून एकूण तीन लाख 43 हजार पाचशे रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक दीलीप तारे, गुन्हेप्रगटीकरण शाखेचे प्रमूख कल्याण शेळके, हेड कॉन्स्टेबल प्रल्हाद ठोंबरे, दीपक कोळी, सतीष जाधव, संतोष सिरसाठ, संजयसिंग डोभाळ, महिला हवालदार लंका घुगे, अंबिका दारुंटे यांनी केली. 

येथे केल्या होत्या चोऱ्या 

  • अंगुरीबाग येथे मनोज रमेश दाभाडे यांच्या घरी चोरी झाली होती. या प्रकरणी संशयितांकडून एक लाख 38 हजारांची तीन किलो चांदी जप्त करण्यात आली. 
  • जवाहरनगर भागातील ज्ञानेश्‍वर भानूदास गुंजाळे यांच्या दोन सोन्याच्या बाळ्या संशयितांकडून जप्त करण्यात आल्या. 
  • शिवाजीनगर येथील शिवाजी लक्ष्मण बरडे यांच्या घरात चोरी झाली होती. या प्रकरणात संशयितांकडून सोन्याची नथ, चांदीचे चैन व रोख साडेतीन हजार जप्त केले. 
  • डॉ. सविता उबाळे यांच्या घरी झालेल्या चोरीप्रकरणी संशयित महिलांकडून एक लाख वीस हजारांचा ऐवज व रिक्षा जप्त करण्यात आला.

अशी होती त्या दोघींची मोडस 

त्या दोघी भंगार वेचण्याच्या नावाने मोठ्या पिशवी घेऊन वसाहतीत जात होत्या. एखाद्या घराला कुलुप दिसताच ते तोडून आत दागिने, भांडे व रक्कम लंपास करायच्या. हे सर्व पोत्यात भरीत होत्या. काम फत्ते झाले की, सोबतच्या एका अल्पवयीन मुलाला रिक्षा घेऊन बोलवून पोबरा करीत होत्या. कुणालाही याची कुणकुण लागणार नाही अशी ही युक्ती त्यांची होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Crime News Woman Looted Doctor