गडकरींचे विधान स्वपक्षातील नेत्याला उद्देशूनच : चंद्रकांत खैरे 

मधुकर कांबळे
Thursday, 16 January 2020

महाएक्‍स्पोच्या कार्यक्रमात बोलतांना श्री. गडकरी यांनी त्या नेत्याचे नाव घेऊन टिका करायला हवी होती, त्यामुळे सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या असत्या असेही खैरे मत व्यक्‍त केले

औरंगाबाद -  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकप्रतिनीधी आणि कंत्राटदारासंदर्भात केलेले विधान हे त्यांच्याच पक्षातील एका बड्या नेत्याला उद्देशून केल्याचा दावा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. माझ्याकडे त्या बड्या नेत्याने राजूर संस्थानची जागा हडपल्याची निनावी तक्रार आल्याचेही त्यांनी म्हटले. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या रविवारी (ता.12) येथील महाएक्‍स्पोच्या समारोपप्रसंगी लोकप्रतिनिधी आणि रस्त्याची कामे करणारे कंत्राटदार यांच्यातील संबध आणि त्यातून रखडलेली कामे याचा दाखला देत गडकरींनी कठोर शब्दांत टिका केली होती. मी देशभरात लाखो कोटींची कामे केली, पण माझ्या घरी कधी एकही कंत्राटदार आला नाही, मराठवाड्यात मात्र काम सुरू होण्याआधीच कंत्राटदाराला लोकप्रतिनिधीच्या घरी जावे लागते असा घणाघात केला होता.

 संबंधित बातमी : सरकारकडे पैसा नाही : नितीन गडकरी 

या संदर्भात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना विचारले असता, ते म्हणाले मी गेल्या तीस वर्षापासून राजकारणात आहे. दोनदा आमदार आणि चारवेळा सलग खासदार म्हणून निवडूण आलो, परंत माझ्या कारकीर्दीत कधी मला असा अनुभव आला नाही. 

मतदारसंघात अनेक विकासाची कामे केली, कोट्यावधींचा निधी त्यावर खर्च केला, पण कधी कुण्या कंत्राटदाराला त्रास दिला नाही. केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी केलेले विधान किंवा त्यांना आलेला अनुभव हा चुकीचा नाही. 

मी खासदार असतांना अनेकदा मतदारसंघातील कामासाठी माझा त्यांच्याशी संपर्क यायचा. खाजगी गप्पांमध्ये त्यांनी अनेकदा मराठवाड्यातील त्यांच्याच पक्षातील एका नेत्याचे नाव घेऊन उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी केलेले विधान हे त्याच नेत्याला उद्देशून होते असे मला वाटते.

 औरंगाबाद-जळगाव रस्त्याचे काम रखडल्याबद्दल श्री. गडकरी यांनी त्यांची नाराजी बोलून दाखवली होती. या रस्त्याचे काम रखडल्याने न्यायालयात देखील याचिका झाली होती. त्यानंतर आधीच्या कंत्राटदाराला बाजूला सारून दुसऱ्या कंत्राटदाराला काम देण्यात आले, यावरून तुमच्या लक्षात आले असेल की गडकरी कुणावर नाराज आहेत.

 क्‍लिक करा : पतंगोत्सवात झळकले ठाकरे सरकार, आपले सरकार 

निनावी तक्रार 

महाएक्‍स्पोच्या कार्यक्रमात बोलतांना श्री. गडकरी यांनी त्या नेत्याचे नाव घेऊन टिका करायला हवी होती, त्यामुळे सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या असत्या असेही खैरे मत व्यक्‍त करुन ते म्हणाले, माझ्याकडे जालना येथून निनावी तक्रार आली आहे. त्यात या बड्या नेत्याने राजूर संस्थानची जागा हडपल्याचे म्हटले आहे. 

हेही वाचा : आघाडीत असूनही कॉंग्रेस वंचितच, राज्यमंत्री सत्तार ठरले भारी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Ex. M. P. Chandrakat Khaire