आघाडीत असूनही कॉंग्रेस वंचितच, राज्यमंत्री सत्तार ठरले भारी! 

मधुकर कांबळे 
बुधवार, 15 जानेवारी 2020

भाजपकडे दोन, तर शिवसेनेकडे तीन सभापतीपदे गेली आहेत, मात्र कॉंग्रेसला सभापतीपदापासून वंचितच रहावे लागले आहे. 

औरंगाबाद - कॉंग्रेसला रोखण्यासाठी शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेली खेळी कॉंग्रेसच्या नशिबाने अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी अयशस्वी ठरली असली तरी ज्या पदासाठी त्यांनी कॉंग्रेसला रोखण्यासाठी राजकीय खेळी केली होती त्या खेळीत ते यशस्वी झाले.

वित्त व बांधकाम समिती सभापतिपदापासून श्रीराम महाजन यांना रोखून स्वत:चे समर्थक किशोर बलांडे यांची वर्णी लावायची होती. मंगळवारच्या निवडणुकीत राज्यमंत्री सत्तार यांची सरशी झाली. श्री. बलांडे यांच्याकडे वित्त व बांधकाम सभापतिपद येण्याची सर्वाधिक शक्‍यता व्यक्‍त करण्यात येत आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राज्यमंत्री सत्तार यांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात माजी जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांना बंड करण्यास भाग पाडले होते. आपल्याला विश्‍वासात न घेता, शिवसेनेकडे अधिकचे संख्याबळ असताना अध्यक्षपद कॉंग्रेसला का द्यायचे, असा प्रश्‍न उपस्थित करीत श्री. सत्तार यांनी करून वेगळी व्यूहरचना केली होती. तसेच महाविकास आघाडीकडून वित्त व बांधकाम समिती सभापतिपदी श्रीराम महाजन यांची वर्णी लावण्याचे प्रयत्न सुरू होते. हेच श्री. सत्तार यांना नको होते.

संबंधित बातमी : अर्थ, बांधकामवर प्रस्थापितांना नकोत भविष्यातील प्रतिस्पर्धी 

सिल्लोड मतदारसंघात ज्यांनी विधानसभेत विरोध केला त्यांना हे सभापतीपद मिळू न देता त्यांनी कधी काळी माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांचे कट्टर समर्थक असलेले व आता राज्यमंत्री सत्तार यांचे समर्थक झालेले किशोर बलांडे यांना हे महत्वाचे सभापतीपद देण्यासाठी त्यांनी अध्यक्षपदाच्यावेळी जोर लावला. तर फुलंब्री तालूक्‍यात आपल्याला दुसरा प्रतिस्पर्धी नको आणि आपल्याला सोडून गेल्याने दुखावलेले डॉ. काळे यांचा किशोर बलांडे यांना विरोध होता. त्यांचे दबावतंत्र अखेर कामाला आले. 

कॉंग्रेस सभापतीपदापासून वंचितच 
 
कॉंग्रेसचे श्रीराम महाजन यांनी शिवसेनेने फसवल्याचा आरोप केला आहे. आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळला पण शिवसेनेने दिलेला शब्द पाळला नाही अशा शब्दांत महाजन यांनी नाराजी व्यक्त केली. कधीकाळी सत्तार यांचे समर्थक आणि त्यांच्यामुळेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले श्रीराम महाजन आज सत्तार विरोधक म्हणून ओळखले जातात. बांधकाम सभापतीपदासाठी इच्छूक असलेले श्री. महाजन यांना राज्यमंत्री श्री. सत्तार यांचा तीव्र विरोध होता. त्यामुळे त्यांना सभापतीपदापासून दूर ठेवत श्री. सत्तार यांनी आपली राजकीय ताकद दाखविली. 

वाचून तर बघा : वाहतुकीचे धडे द्यायला चक्‍क यमराजा उतरलाय रस्त्यावर, नियमभंग करणाऱ्यासोबत सेल्फी 

कॉंग्रेसला चिठ्ठीद्वारे अध्यक्षपद मिळाल्यानंतर महाविकास आघाडी म्हणून कॉंग्रेसला दोन सभापतीपदे दिली जावीत, अशी मागणी केली जात होती. किशोर बलांडे यांना सभापतीपद मिळाले आहे. ते जरी कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडून आले असले तरी ते सत्तार समर्थक असल्याने व शिवबंधन बांधल्यामुळे त्यांचा कॉंग्रेसला फारसा उपयोग होणार नाही. उपाध्यक्ष भाजपचे एल.जी. गायकवाड यांच्याकडे आधीच कृषी व पशुसंवर्धन सभापतीपद असल्याने अनुराधा चव्हाण यांना मिळालेल्या महिला व बालकल्याण सभापतीपदामुळे भाजपकडे दोन, तर शिवसेनेकडे तीन सभापतीपदे गेली आहेत, मात्र कॉंग्रेसला सभापतीपदापासून वंचितच रहावे लागले आहे. 

क्‍लिक करा : म्हणुन विद्यापीठाच्या गेटवर येतात लाखो भीमसैनीक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad in z.p. election, minister of state  Sattar powerful