कचरामुक्तीमध्ये चमकेना औरंगाबादचा स्टार

Aurangabad amc news
Aurangabad amc news

औरंगाबाद : शहराच्या कचराकोंडीनंतर राज्य शासनाने महापालिकेला कोट्यवधी रुपयांना निधी दिला. दोन वर्षानंतरही कचरा प्रक्रिया केंद्रांची कामे सुरूच असून, अद्याप शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न मार्गी लागला नसल्याने केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या कचरा मुक्त शहर (गारबेज फ्री सिटी) स्पर्धेत महापालिकेला मोठा फटका बसला आहे. उत्कृष्ट काम करणाऱ्या शहरांना यंदा स्टार देण्यात आले आहे. मात्र औरंगाबाद महापालिकेला कुठलेही स्टार मिळालेले नाही. उलट जालना शहराला थ्री स्टार तर फुलंब्री आणि पैठणला सिंगल स्टार मिळाल्याने या शहरांची कामगिरी महापालिकेपेक्षा सरस ठरली आहे. 

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कचरा मुक्त शहराचे सर्व्हेक्षण सहा महिन्यापूर्वी केंद्र सरकारच्या पथकांमार्फत करण्यात आले होते. त्याचा निकाल मंगळवारी (ता. २०) जाहीर झाला. त्यात महाराष्ट्रात केवळ नवी मुंबईच्या वाट्याला पाच स्टार आले आहेत. औरंगाबादसह पुणे, नागपूर,नाशिक या शहरांची कामगिरी देखील खालावली आहे. तसेच नवी मुंबई, म्हैसूर, सुरत, इंदोर, अंबाला या महापालिकांना पाच स्टार मिळाले आहेत. औरंगाबाद शहराच्या वाट्याला एकही स्टार आला नाही. विशेष म्हणजे कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला आहे. मात्र चिकलठाणा वगळता नारेगाव, कांचनवाडी व पडेगावर येथील प्रकल्प महापालिकेला वेळेत सुरु करता आलेले नाहीत. या कचरा केंद्रांच्या परिसरातच कचऱ्याचे डोंगर साचले आहेत. त्याचा फटका औरंगाबाद महापालिकेला बसला आहे. लोकसहभागात देखील महापालिका कमी पडली आहे. 

अशी आहे कचराकोंडीची पार्श्‍वभूमी 
शहरात फेब्रुवारी २०१६ मध्ये नारेगाव येथील कचरा डेपोवर कचरा टाकण्यास परिसरातील ग्रामस्थांनी विरोध केला व कचराकोंडी निर्माण झाली. त्यानंतर कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी शासनाने ९१ कोटींचा निधी दिला. त्यानुसार महापालिकेने कचरा प्रक्रियेसाठी डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार केला. त्यानंतर पुन्हा डीपीआरमध्ये सुधारणा करण्यात आली व तो १४८ कोटीवर गेला. त्यानुसार सुधारित डीपीआरला देखील मंजुरी देण्यात आली. निधी मंजूर असताना देखील महापालिका कामे कमी करण्यात अपयशी ठरली. नारेगाव येथील बंद कचरा डेपोमध्ये अद्याप लोखो टन कचरा पडून आहे. चिकलठाणा येथे कचरा प्रक्रिया केंद्र (प्रकल्प) सुरु करण्यात आला पण तो अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरु झाला नाही. पडेगाव येथेही अशीच स्थिती आहे. कांचनवाडी येथे कचऱ्यापासून गॅस निर्मिती केली जाणार आहे. मात्र अद्याप हा प्रकल्प सुरु झालेला नाही. 

स्वच्छता सर्व्हेक्षणातही घसरण 
स्वच्छता सर्वेक्षणातही शहराचा आलेख घसरत आहे. २०१६ औरंगाबाद ५६ व्या स्थानी होते. २०१७ मध्ये औरंगाबादचा क्रमांक २९९ वर गेला. २०१८ मध्ये क्रमांक १२६ वर आला. गतवर्षी २०१९ मध्ये शहराचा क्रमांक २२० वर होता. यंदाचे रॅंकींग लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com