esakal | Aurangabad Graduate Election Analysis : काम झाले मात्र, देखाव्यापुरतेच! भाजपला आत्मपरीक्षणाची गरज
sakal

बोलून बातमी शोधा

boralkar

यंदाच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत वाढलेला मतदानाचा टक्का भाजपच्या पथ्यावर पडेल असे वाटले होते. मात्र, चित्र उलटे झाले. पुन्हा मतदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्याकडे कौल दिला.

Aurangabad Graduate Election Analysis : काम झाले मात्र, देखाव्यापुरतेच! भाजपला आत्मपरीक्षणाची गरज

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : यंदाच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत वाढलेला मतदानाचा टक्का भाजपच्या पथ्यावर पडेल असे वाटले होते. मात्र, चित्र उलटे झाले. पुन्हा मतदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्याकडे कौल दिला. चव्हाणांच्या लिड इतकीच मते भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकरांना मिळाली. याचे कारण म्हणजे, भाजपममध्ये काम झाले, मात्र देखाव्यापुरतेच, हे स्पष्ट झाले आहे.निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपमध्ये उमेदवारीवरून खल झाला होता. नेमक्या याच कारणावरून अनेकांमध्ये नाराजी दिसून आली.

मात्र पक्षाने काम करा असा आदेश दिल्यामुळे सर्वांनी काम केले, मात्र तेही देखाव्यापुरतेच झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. पक्षातील अनेकांची नाराजी, बंडखोरी ही बोराळकरांच्या पराभवासाठी तर महाविकास आघाडीच्या उमेदवारीच्या विजयासाठी कारण ठरली. भाजपमधील अंतर्गत खदखद आणि शिवसेनेने केलेल्या प्रामाणिक कामामुळे मोठ्या लिडने चव्हाण विजयी झाले. बोराळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने प्रवीण घुगे, रमेश पोकळे, जयसिंगराव गायकवाड, किशोर शितोळे हे नाराज झाले. नाराजांना शांत करण्यासाठी थेट प्रदेश आणि केंद्रीय कार्यकारिणीवरून समजूत काढण्यात आली. सर्वजण कामाला लागले, घरोघरी भाजपचे काम, उमेदवाराचा प्रचार झाला. मात्र मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यात भाजपचे कार्यकर्ते अपयशी ठरले. लिड मिळणे सोडाच पण २०१४ च्या तुलनेत केवळ ५ हजार २७६ मते वाढली.

उमेदवारावरील नाराजी
२०१४ मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी पदवीधरसाठी शिरीष बोराळकर यांना संधी दिली होती. त्याचवेळी देशभरात मोदींची हवा होती. त्याच वेळी हा मतदारसंघ ताब्यात येईल असे वाटले होते. मात्र तेव्हाही राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला होता. यावेळी तर भाजपने मराठवाडाभर पोषक वातावरण निर्मिती केली होती. यासह प्रवीण घुगे व बोराळकर यांनी एक ते दीड लाख सदस्यांची नोंदणीही केली. मात्र हे मतदार मतपेटीपर्यत पोचलेच नाही. यंदा शिरीष बोराळकरांना दुसऱ्यांदा संधी मिळाली. त्यामुळे अनेक कार्यकर्ते नाराज झाले. उमेदवारी न मिळाल्यामुळे जयसिंगराव गायकवाड यांनी थेट पक्षाविरोधात जात सतीश चव्हाणांसाठी संपूर्ण मराठवाडा मतदारसंघ पिंजून काढला. भाजपच्या नाराजांना आपल्याकडे वळविले. त्यासह माजी मंत्री पंकजा मुंडेंचे समर्थक असलेले रमेश पोकळे यांनीही बंडखोरी केली. शिरीष बोराळकर निवडूण येणार असल्याचा अति आत्मविश्‍वास असल्यामुळे पक्षातील अनेक दशकांपासून काम करणाऱ्या निष्ठावंतांकडे दुर्लक्ष केले. प्रचारासाठी त्यांच्यात समन्वय ठेवला नाही.

मित्रपक्षाकडे दुर्लक्ष
महायुतीत सहभागी असलेल्या शिवसंग्राम, रासप, रयत क्रांती संघटना, भारतीय रिपब्लिकन पक्ष(आठवले) या मित्रपक्षांचा कुठेच सहभाग दिसून आला नाही. त्यांना भाजपतर्फे प्रचारासाठी बोलविण्यात आले नाही. याचाही फटका भाजपला बसला आहे. एकूणच भाजपचा आत्मविश्‍वास नडला, सर्व यंत्रणा असूनही भाजपला पराभवाचे तोंड पहावे लागले. आता भाजपला आत्मपरिक्षणाची गरज आहे, अन्यथा महापालिकेतही असेच चित्र राहील.

Edited - Ganesh Pitekar