लासूर स्टेशन ग्रामपंचायतीवर भाजपचे आमदार बंब यांची सत्ताः वंचित, महाविकास आघाडीच्या पॅनलचा पराभव

अविनाश संगेकर
Monday, 18 January 2021

आमदार बंब व पंचायत समितीचे उपसभापती संपत छाजेड यांच्या समतोल पॅनलसमोर वंचित, महाविकास आघाडी व मनसेच्या एकत्र पॅनेलने आव्हान उभे केले होते.

लासूर स्टेशन (जि.औरंगाबाद) : जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या लासूर स्टेशन (ता.गंगापूर) या आमदार प्रशांत बंब यांच्या गावची ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी आमदार बंब व पंचायत समितीचे उपसभापती संपत छाजेड यांच्या समतोल पॅनलसमोर वंचित, महाविकास आघाडी व मनसेच्या एकत्र पॅनेलने आव्हान उभे केले होते. परंतु मतदारांनी आमदारांच्या पॅनललाच भरभरून मतांचे दान दिले. समतोल पॅनलचे अगोदरच तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.

उर्वरित चौदा जागेसाठी झालेल्या निवडणुकीत आमदार पॅनलचे तेरा सदस्य निवडून आले, तर विरोधी पॅनलला एक जागा मिळाली. या एका जागेकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले होते. प्रभाग दोनमधील या जागी आमदार पॅनलचे माजी उपसरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व बाजार समितीचे संचालक सुरेश जाधव यांचा शिवसेनेचे शहरप्रमुख अमोल शिरसाट यांनी केलेला पराभव हाच मोठा धक्का तर याची फेड करत आमदार पॅनलचे प्रभाग पाचमधील बावीस वर्षाच्या तरुण उमेदवार मयूर जैस्वाल याने शिवसेनेचे पंचायत समितीचे माजी सभापती संजय जैस्वाल यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला.

या दोन्ही लढतीकडे गावासह परिसरातील सर्वांचेच लक्ष होते. निवडणुकीत एकतर्फी निकाल लागल्याचे दिसून आले असले तरी वंचित, शिवसेनेच्या पॅनेलने चांगलेच आव्हान उभे केल्याचे चित्र निर्माण केले होते. निवडणूक आलेले उमेदवार पुढील प्रमाणे आहेत; प्रभाग एक : कल्याण पवार, मीना पांडव, मोनिका सौदागर, प्रभाग दोन : श्वेता ठोळे, सुनीता मढीकर, अमोल शिरसाट, प्रभाग तीन : गणेश व्यवहारे, शिला गाडे, प्रभाग चार : संपत छाजेड (बिनविरोध), पंचशीला जाधव, शमीना मन्सुरी, प्रभाग पाच : सुनंदा कांजुने (बिनविरोध), मयूर जयस्वाल, नारायण वाकळे (बिनविरोध), प्रभाग सहा : रंजना बोरकर, राजू गायकवाड, प्रकाश कोकरे

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Gram Panchayat Result MLA Prashant Bamb Panel Win Lasur Station