'हर्षवर्धन जाधवांचे राजकारणात 'कमबॅक', ग्रामपंचायतच्या निकालातून देणार उत्तर'

harshvardhan jadhav
harshvardhan jadhav

कन्नड (जि.औरंगाबाद) : तालुक्यातील त्रस्त असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हर्षवर्धन जाधव राजकारणात सक्रिय होत असल्याची घोषणा हर्षवर्धन जाधव यांचे सुपुत्र आदित्य जाधव यांनी वडिलांच्या अनुपस्थितीत मंगळवारी कन्नड येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत रायभान जाधव यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली असून नवख्या आदित्यने पत्रकारांच्या खोचक प्रश्नांनाही अतिशय समर्पक उत्तरे दिली. आदित्य जाधव यांनी ऐन ग्रामपंचायतीच्या निवडणूक रणधुमाळीत उडी घेऊन हर्षवर्धन जाधव सक्रिय होणार असल्याची घोषणा करून वडील अटकेत असताना स्वतः सर्व सूत्र हातात घेतले आहे. या निमित्ताने स्वतःचीही राजकीय वाटचाल सुरू केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

तालुक्यातील शेतकरी अनंत अडचणीत असून आणेवारी, पंचनामे, बंद पडलेली मका खरेदी, अवकाळी पावसाने झालेले नुकसान यासह विविध समस्यांनी शेतकरी त्रस्त आहेत. आता शेतकऱ्यांसाठी अधिक शांत बसू शकत नाही वडील हर्षवर्धन जाधव हे राजकारणात सक्रिय होत असून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती लढवणार असल्याची घोषणाही आदित्य जाधवने यावेळी केली. 

शिवाय हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे तालुक्यातील आणेवारी ५० पेक्षा खाली आली असल्याने विजमंडळाने तीन महिन्यांपर्यंत शेतकऱ्यांची वीज कट करू नये असा शासनाचा अध्यादेश असून जर वीज मंडळाचे अधिकारी कर्मचारी या आदेशाची पायमल्ली करत असेल तर त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया करण्यात येईल असा सज्जड दमही दिला.

तालुक्यातील सर्व कार्यकर्ते सोबत असून त्यांचा सुरू असलेला पाठवपुरावा आणि शेतकऱ्यांना कुणी वाली नसल्यासारखी परिस्थिती असताना व वडील सोबत नसताना आदित्यने सक्रिय राजकारणाची घोषणा केली आहे. तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी आदित्य जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना आदित्यने समर्पक उत्तरे दिली. तर पिशोर येथील ग्रामपंचायत मध्ये हर्षवर्धन जाधव यांच्या पॅनलचा प्रचार करणार असाल तर तेथे आई संजना ताई जाधव यांचेही पँनल असणार यावर आदित्य ने सांगितले की संविधानाने सर्वाना निवडणुकीत उभा राहण्याचा हक्क दिलेला आहे त्यामुळे कुणी निवडणुकीला सामोरे जावे हा प्रत्येकाचा वयक्तिक प्रश्न आहे. संविधानाने त्यांना तो दिलेला हक्क असून त्या त्यांचा हक्क बजावत असतील तर त्यात वावगे काय? असे समर्पक उत्तर दिले शिवाय वडील राजकारणात असताना शेतकऱ्यांसाठी लढत असताना, त्यांना न्याय मिळवून देताना मोठ्या नामांकित नेत्यांसोबत त्यांचे वाद झाले आहे मात्र आता शेतकऱ्यांसाठी परत एकदा ते राजकारणात सक्रिय होत असल्याचे सांगितले. 

त्यावेळी पत्रकारांनी त्यांना विचारले की नामांकित लोक, नेते, म्हणजे नेमके कोण? पत्रकारांचा रोख आजोबा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे होता मात्र आदित्यने याही प्रश्नास पत्रकारांचा व्होरा ओळखून वादाचा मुद्दा टाळून समर्पक उत्तर दिले. शिवाय निवडणुकांच्या निकलातूनच आता विरोधकांना उत्तर देणार असल्याचेही यावेळी आदित्य जाधव यांनी ठासून सांगितले.

एकूणच आदित्य जाधव याने पहिल्याच पत्रकार परीषदेत राजकीय चुणूक दाखविली असून रायभान जाधव यांच्या तिसऱ्या पिढीने राजकारणात सक्रिय प्रवेश केला असल्याने तसेच हर्षवर्धन जाधव अटकेत असताना आदित्यने ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत उडी घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com