इथे पादचाऱ्यांची किंमत शून्य 

संदीप लांडगे
रविवार, 5 जानेवारी 2020

सेव्हन हिल ते क्रांती चौक संपेपर्यंत कुठेही फुटपाथ उपलब्ध नाही. अनेक सिग्नलच्या ठिकाणी पदपथच नाहीत. त्यामुळे पादचाऱ्यांना पुढे सरळ जाण्यासाठी अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. 

औरंगाबाद : देशातील स्मार्ट सिटीच्या शहरात औरंगाबादचा समावेश करण्यात आला आहे. परंतु, या स्मार्ट सिटीमध्ये पादचाऱ्यांची किंमत शून्य असल्याचे निदर्शनास येत आहे.

कारण शहरातील 70 टक्के रस्त्यांवर फुटपाथ नाही, तर 85 टक्के रस्त्यावर लेन मार्किंग नाही. अशा परिस्थितीत रस्त्यावरून चालायचं कसं? असा सवाल औरंगाबादकरांनी केला आहे. 

शहराच्या मध्यावरून गेलेल्या जालना रस्त्यावर काही ठिकाणी फुटपाथ आहे, तर काही ठिकाणी फुटपाथच नाही. त्यामुळे पादचाऱ्यांना पावलोपावली अडथळे येतात. बहुतांश पदपथावर, एमएससीबीची डीपी, जाहिरातीचे बोर्ड, चहाच्या टपऱ्या, पानाचे ठेले, छोटीमोठी दुकाने थाटून अतिक्रमणे केलेली आहेत. 

पदपथांची स्थिती 

 • पदपथ नाहीत : 70 टक्के 
 • रस्त्यांच्या एकाकडेचे पदपथ : 10 टक्के 
 • रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे पदपथ : 15 टक्के 

हेही वाचा -  शाळेत उपलब्ध सॅनिटरी नॅपकिन अन्‌ चेंजिंग रूम

सेव्हन हिल ते क्रांती चौक संपेपर्यंत कुठेही फुटपाथ उपलब्ध नाही. अशा ठिकाणाहून रस्त्याच्या कडेपर्यंत येण्यासाठी भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांचा अडथळा दररोज पार करावा लागतो. अनेक सिग्नलच्या ठिकाणी पदपथच नाहीत. त्यामुळे पादचाऱ्यांना पुढे सरळ जाण्यासाठी अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. 

लेन मार्किंगचा अभाव 

सुरक्षित रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग असणे गरजेचे असते. बाबा पेट्रोलपंप ते चिकलठाणा रस्त्यादरम्यान एकूण 15 सिग्नल लागतात. या पंधरा सिग्नलपैकी फक्त तीन सिंग्नलवर झेब्रा क्रॉसिंग केलेले आहे. त्यामुळे रहदारीचा रस्ता ओलांडताना महिला, नागरिक, तरुणांना पहिले पाऊल टाकताना हिंमत एकवटावी लागते. 

लेन मार्किंगची स्थिती

 • लेन मार्किंग नसलेले रस्ते : 85 टक्के 
 • खराब मार्किंग असलेले रस्ते : 5 टक्के 
 • योग्य मार्किंग असलेले रस्ते : 8 टक्के 
 • चांगले मार्किंग असलेले रस्ते : 2 टक्के 

हेही वाचा -   एसटी महामंडळाची हिटलरशाही

अशा स्थितीत कोणाच्याही मदतीशिवाय शाळकरी मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी रस्ता ओलांडणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण दिल्यासारखेच आहे. फुटपाथ व झेब्रा क्रॉसिंग नसल्याने पादचाऱ्यांच्या अपघाताचा धोका सातत्याने वाढत आहे.

रस्त्यावर चालकांना वाहन चालविणे सुलभ होण्यासाठी लेन मार्किंग आवश्‍यक आहे. अशा चांगल्या लेन मार्किंगचे प्रमाण बाबा पेट्रोलपंप ते चिकलठाणा रोडवर जेमतेम 20 टक्केच, 80 टक्के रस्त्यांवर लेन मार्किंगचा अभाव आहे. 


  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: Aurangabad Jalna Road Footpath News