कोविड सेंटरमध्ये महिला रुग्णांची धावाधाव, रात्र काढावी लागते जागूनच !

माधव इतबारे
Saturday, 19 September 2020

औरंगाबादेतील कोविड सेंटरमधील विदारक चित्र, एकीची अचानक प्रकृती खालावली; डॉक्टर नसल्याने रुग्णांचा संताप.  

औरंगाबाद : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेच्या कोविड केअर सेंटर अपुरे पडत आहे. नव्याने भरती होणाऱ्या रुग्णांसाठी जागा करण्यासाठी जुन्या तिव्र लक्षणे नसलेल्या रुग्णांना इतरत्र हलविले जात असून, मेल्ट्रॉन येथील कोविड हॉस्पिटलमध्ये काही महिला रुग्णांना दुसऱ्या मजल्यावर हालविण्यात आले. त्याठिकाणी नर्स व डॉक्टर रात्री हजर राहत नाहीत. शनिवारी (ता. १९) पहाटे एका महिलेचा त्रास अचानक वाढल्याने इतर महिलांनी धावत जाऊन डॉक्टरांना पाचारण केले. त्यानंतर तिला घाटी रुग्णालयात हालविण्यात आले.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

 
मेल्ट्रॉन येथील कोविड रुग्णालयात पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र वॉर्ड आहेत. दोन दिवसांपूर्वी महिला वॉर्डातील ज्यांना तीव्र लक्षणे नाहीत, अशांना दुसऱ्या मजल्यावर जाण्यास सांगण्यात आले. सुमारे २० महिला दुसऱ्या मजल्यावर गेल्या. दिवसभर याठिकणी नर्स, डॉक्टर भेटी देतात मात्र रात्रीच्यावेळी कोणाही फिरकत नाही. शनिवारी पहाटे एका महिलेला अचानक त्रास सुरू झाला. त्यामुळे शेजारी असलेल्या रुग्ण महिलांना पळापळ करून डॉक्टरांना बोलवावे लागले. त्यानंतर संबंधित महिलेला तातडीने घाटी रुग्णालयातच हालविण्यात आले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

भीतीपोटी रात्रभर जागरण 
दुसऱ्या मजल्यावर असलेल्या महिला रुग्णांना रात्र भीतीपोटी जागून काढावी लागत आहे. या वॉर्डात डॉक्टर, नर्स भेट देत नाहीत. पण साधा सुरक्षारक्षक देखील नाही. सुमारे वीस महिलाच असल्याने व हा परिसर निर्मनुष्य असल्याने आम्हांला रात्री भीतीपोटी झोपही येत नाही, असे महिला रुग्णांचे म्हणणे आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रशासकांकडे तक्रार; पाहणीचा फार्स 
यासंदर्भात एका रुग्णाने प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर श्री. पाडेय यांनी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांना पाहणी करण्याची सूचना केली तसेच हॉस्पिटलची जबाबदारी असलेल्या डॉक्टरला फोन करून तंबी दिली. डॉ. पाडळकर यांनी दुपारी हॉस्पिटलला भेट दिली मात्र तक्रार असलेल्या दुसऱ्या मजल्यावरील वॉर्डात त्या गेल्याच नाहीत, असे सूत्रांनी सांगितले. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Kovid Center Dismembering picture