कराची थकबाकी तब्बल 516 कोटींवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 डिसेंबर 2019

महापालिकेने वर्ष 2019-20 या आर्थिक वर्षात वर्षांत मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दिष्ट 211 कोटी रुपयांचे ठेवले आहे; मात्र गेल्या नऊ महिन्यांत केवळ 63 कोटी रुपयांची वसुली झाली आहे. चालू व थकीत कर वसूल करण्यासाठी व्याज आणि दंडाच्या रकमेत 75 टक्के सूट लागू करण्यात आली आहे.

औरंगाबाद- महापालिकेच्या तिजोरीत एकीकडे खडखडाट असताना दुसरीकडे केवळ मालमत्ताकराची थकबाकी 516 कोटींवर गेली आहे. चालू वर्षाचे 145 कोटी रुपये थकीत आहेत, तर जुनी थकबाकी 368 कोटींवर गेली आहे. त्यात व्यावसायिक मालमत्ताधारकांकडेच 155 कोटी रुपये थकीत आहेत. शास्ती व करामध्ये महापालिकेने सध्या 75 टक्‍क्‍यांपर्यंत सूट दिली असून, या महिनाभराच्या काळात थकीत रक्कम वसूल करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. 

महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे शहरातील विकास कामांवर परिणाम होत आहे. वारंवार प्रयत्न करूनही मालमत्ता कराच्या वसुलीमध्ये वाढ होत नसल्याने अधिकारीही त्रस्त आहेत. त्यामुळे थकबाकी एकरकमी भरणाऱ्यांना व्याज व शास्तीच्या रकमेत तब्बल 75 टक्‍क्‍यांपर्यंत सूट देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. महिनाभरासाठी ही सूट राहणार आहे. थकबाकीची एकूण रक्कम 516 कोटींवर गेल्यामुळे नागरिकांनी सुटीचा फायदा घेऊन कर भरावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. यासंदर्भात महापौर नंदकुमार घोडेले यांनी विचारणा केली असता, कर मूल्यनिर्धारक व संकलक करणकुमार चव्हाण यांनी सांगितले, की थकबाकीमध्ये व्याज आणि दंडाची रक्‍कम जास्त आहे.

हेही वाचा - बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे

महापालिकेने वर्ष 2019-20 या आर्थिक वर्षात वर्षांत मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दिष्ट 211 कोटी रुपयांचे ठेवले आहे; मात्र गेल्या नऊ महिन्यांत केवळ 63 कोटी रुपयांची वसुली झाली आहे. चालू व थकीत कर वसूल करण्यासाठी व्याज आणि दंडाच्या रकमेत 75 टक्के सूट लागू करण्यात आली आहे. ही सवलत 23 डिसेंबरपासून 22 जानेवारीपर्यंत लागू असणार आहे. एक लाखावरील बड्या थकबाकीदार मालमत्ताधारकांना वैयक्तिक पत्र पाठविण्यात येत आहेत. त्यात सवलतीमुळे किती रुपयांचा लाभ होऊ शकतो याची नोंद असेल. 

महापालिका मुख्यालयात कायमस्वरूपी कॅम्प 
करवसुलीसाठी महापालिका मुख्यालयात कायमस्वरूपी कॅम्प लावण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. तसेच वॉर्डातही कॅम्प लावले जाणार आहेत. मालमत्ताकराची काही वादग्रस्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कर अदालत घेण्यात येणार आहे, असे करनिर्धारक व संकलक करणकुमार चव्हाण यांनी सांगितले. 
 
पहिल्याच दिवशी नऊ लाखांची सूट 
शास्ती व व्याजाच्या रकमेत सूट दिल्यानंतर पहिल्याच दिवशी 219 जणांनी लाभ घेतला. या सर्वांना करात नऊ लाख 55 हजार रुपयांची सूट देण्यात आली. त्यांनी 38 लाख रुपयांचा भरणा केला, असे चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा-


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Latest News