खासगी प्रवासी बसेस वाहतुकीत बदल, सकाळी सात ते अकरापर्यंत शहरात बंदी

अनिल जमधडे
Saturday, 20 February 2021

लग्न समारंभ, पर्यटन, धार्मिक कार्यक्रम व इतर ऐनवेळीचे कार्यक्रमासाठी शहरात येणा-या व जाणा-या लक्झरी बसेसला वाहतूक विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालयाकडून वाहतूकीचे कारण व कालावधीबाबत लेखी अर्ज देवुन परवानगी घेणे बंधनकारक राहील.

औरंगाबाद : शहरातील वाढती लोकसंख्या व वाहनांची वाढती संख्या, अरुंद व खराब रस्ते तसेच कामगारांच्या बसेस व इतर वाहनांची रस्त्यावरील वर्दळ वाढतीच आहे. त्यातून संभाव्य वाहतुकीची कोंडी व अपघात टाळण्यासाठी, नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी शहरात खासगी प्रवासी बसेस (लक्झरी) वाहनांच्या वाहतूक नियोजनात अंशत: बदल करण्यात आले आहेत.

आयुक्तालय हद्दीत येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व लक्झरी बससाठी सकाळी सात ते रात्री अकरापर्यंत प्रवेश बंदी आहे. त्यांना काही निवडक मार्गापासूनच शहरात येण्यास परवानगी आहे. ही अधिसूचना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस, कामगार वाहतुकीच्या बसेस, शालेय विद्यार्थी यांच्या बसेस, शासकीय, निमशासकीय बसेस, अत्यावश्यक सेवा अशी वाहने वगळुन असेल.

लग्न समारंभ, पर्यटन, धार्मिक कार्यक्रम व इतर ऐनवेळीचे कार्यक्रमासाठी शहरात येणा-या व जाणा-या लक्झरी बसेसला वाहतूक विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालयाकडून वाहतूकीचे कारण व कालावधीबाबत लेखी अर्ज देवुन परवानगी घेणे बंधनकारक राहील. अधिसुचनेचा भंग करणारी व्यक्ती महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १३१ व अन्य फौजदारी कायद्यान्वये अपराधास पात्र राहील व सध्याच्या मोटार वाहन कायदयाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. ही अधिसुचना अत्यावश्यक सेवेतील पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमक दलाच्या वाहनांना लागु राहणार नाही.

वाचा - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : पूजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी लढणार : तृप्ती देसाई

या मार्गाचा करावा वापर
-पुणे-नगर, धुळे-वैजापुर कडून येणा-या लक्झरी बसेस नगरनाका, लोखंडी पुल, बाबा पेट्रोल पंप मार्गे पंचवटी व परत
नगरनाका पासुन पुढे जाऊ शकतात.
-पैठण कडुन येणा-या लक्झरी बसेसना या लिंकरोड, महानुभव आश्रम चौक, बीड बायपास रस्ता, संग्रामनगर उड्डाणपुल मार्गे शहानुरमियाँ दर्गा चौकापर्यंत प्रवेश राहील.
-जालना कडुन येणाऱ्या लक्झरी बसेसना या केंब्रिज चौक, झाल्टा फाटा, बीड बायपास रोड, गोदावरी टी मार्गे शहानुर मियाँ
दर्गा चौकपर्यंत प्रवेश राहील.
-जळगांव रस्त्याकडून येणाऱ्या लक्झरी बसेस या हर्सल टी, जळगांव टी, चिकलठाणा, केंब्रिज चौक, झाल्टा फाटा, बीड
बायपास मार्गे जातील.
-सार्वजनिक मार्गावर कोणत्याही ठिकाणी लक्झरी बसमध्ये प्रवासी बसविणे व उतरविण्यास मनाई करण्यात आली आहे.
-लक्झरी बसेसना शहरात परवानगी असलेल्या वेळेत त्यांचा ताशी वेग ४० किलोमिटर प्रति तास पेक्षा जास्त असु नये याची दक्षता घ्यावी.

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Live Updates Private Travelling Buses Routs Change