काळजी घ्या... अन्यथा होऊ शकताे दंड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी बांधकाम सुरू असलेल्या मालमत्ताधारकांनी बांधकामे जाळीने आच्छादित करावीत, धुळीने प्रदूषण वाढणार नाही, याची काळजी घ्यावी; अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. 

औरंगाबाद- शहरात शेकडोंच्या संख्येने नवी बांधकामे सुरू असून, मालमत्ताधारक रस्त्यावर खडी, वाळू, विटा टाकून रहदारीला अडथळा निर्माण करीत आहेत. त्यासोबतच बांधकामे करताना प्रदूषण टाळण्यासाठी आवश्‍यक जाळ्या बसविल्या जात नाहीत. त्यामुळे यापुढे बांधकामे सुरू असताना जाळ्या बसवाव्यात; अन्यथा महापालिकेतर्फे दंडात्मक कारवाई केली जाईल, असे आदेश आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी काढले आहेत. 

 

ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी !

महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी पदभार घेतल्यानंतर शहरातील विविध भागांत फिरून पाहणी केली. यावेळी अनेक ठिकाणी बांधकामे सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. काही ठिकाणी जाऊन त्यांनी बांधकाम परवानगी आहे का? अशी विचारणाही केली. बांधकामासाठी कुठले पाणी वापरले जाते? याची माहिती घेतली. या पाहणीतच बांधकाम करताना आवश्‍यक जाळ्या बसविल्या जात नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. या जाळ्या नसल्यामुळे धूळ थेट रस्त्यावर येऊन शहराचे प्रदूषण वाढत आहे.

शहरातील हवेत धुळीचे कण धोकादायकरीत्या वाढल्याचे नुकतेच समोर आले होते. त्यामुळे महापालिकेने प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत, तर दुसरीकडे बांधकाम करताना मालमत्ताधारक योग्य ती काळजी घेत नसल्यामुळे या उपाययोजना कुचकामी ठरत आहेत. त्यामुळे आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी बांधकाम सुरू असलेल्या मालमत्ताधारकांनी बांधकामे जाळीने आच्छादित करावीत, धुळीने प्रदूषण वाढणार नाही, याची काळजी घ्यावी; अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. 
 
खडी, वाळू रस्त्यावर नको 
अनेक भागांत बांधकामाची खडी, वाळू रस्त्यावर साठविली जाते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होणे, अपघात होणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे मुख्य रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकू नये, असेही आदेशात आयुक्तांनी नमूद केले आहे. 
 
कारवाईचे अहवाल द्या 
उपाययोजनेसंदर्भात मालमत्ताधारकांना आवाहन करण्यात यावे. त्यानंतरही नियमभंग करणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश उपायुक्त रवींद्र निकम, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे, सर्व वॉर्ड अधिकारी, वॉर्ड अभियंता यांना काढण्यात आले आहेत. कारवाई करून अहवाल आयुक्तांच्या माहितीस्तव सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

गुंता कायम -  जिल्हा परिषद हातात आली, मात्र आता विरोधात कोण?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal Commissioner Astikumar Pandey News