
ऐन दिवाळीत औरंगाबाद महापालिकेचे जुनेच कंत्राटदार करणार मोफत पथदिवे लावून देणार आहेत. अर्थात ही दिवाळी बंपर ऑफर शहरवासियांना लाभदायक ठरावी अशी आशा आहे.
औरंगाबाद : कोट्यवधी रुपयांच्या एलईडी प्रकल्पावरून महापालिकेत चांगलाच वाद पेटला होता. महागडे दिवे असल्याचे कारण देत निविदा रद्द करण्याचा निर्णय घेणारे प्रशासन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बॅकफूटवर आले व कंत्राटदाराला पहाटेच वर्क ऑर्डर देण्यात आली. आता हाच कंत्राटदार शहरात आणखी १७ हजार पथदिवे लावणार आहे, तेही मोफत!
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
महापालिकेने शहरातील जुने पथदिवे बदलून त्याठिकाणी नवे एलईडी दिवे लावण्याचे कंत्राट मे. इलेक्ट्रॉन लायटिंग सिस्टीम कंपनीला २०१६ मध्ये दिले आहे. कंपनीने आत्तापर्यंत ४० हजार दिवे लावले असले तरी शहर परिसरात आणखी १५ हजार दिवे लावणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या एजन्सीमार्फत दिवे लावण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. दरम्यान जुन्याच कंपनीने हे काम करण्यासाठीचा प्रस्ताव महापालिकेला दिला. महापालिकेने या कामाचे पैसे मिळणार नाहीत, असे स्पष्ट केले. त्यास कंपनी तयार झाली आहे. यासंदर्भात प्रशासक आस्तितकुमार पांडेय यांनी सांगितले की, मे. इलेक्टॉन कंपनीचा ४० हजार पथदिव्यांचा प्रकल्प पूर्ण झाला आहे. असे असले तरी नव्याने १७ हजार एलईडी दिवे शहराच्या विविध भागात लावणे गरजेचे आहे. यातील काही दिवे लावण्यातही आले आहेत. उर्वरित दिवेही आगामी काही दिवसात लावले जातील. दोन हजार दिवे राखीव ठेऊन गरजेनुसार लावले जातील. हे काम कंपनी मोफत करणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
बिलात झाली कपात
एलईडी दिवे बसवण्याचे काम तब्बल ११२ कोटी रुपयांत दिले आहे. त्यानंतर देखभाल-दुरुस्तीचे पुढील आठ वर्षांसाठीचे काम याच कंपनीला देण्यात आले. त्यामुळे हे काम १२० कोटीवर गेले आहे. मात्र तत्कालीन प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी ही निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यात आला. पथदिव्यापोटी महापालिकेला सुमारे सव्वा कोटी रुपये बिल येत होते. आता हा आकडा ७० ते ८० लाखावर आल्याचे प्रशासकांनी सांगितले.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
(संपादन-प्रताप अवचार)