धरसोडीमुळे ढेपाळली औरंगाबाद स्मार्ट सिटीतील कामे

smart city news.jpg
smart city news.jpg

औरंगाबाद : ‘‘स्मार्ट सिटी योजनेची घोषणा होऊन चार वर्षे उलटली आहेत. केंद्र व राज्य शासनाने ठरल्याप्रमाणे औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनला निधीही दिला. मात्र, चार वर्षांत बोर्डाला केवळ दोनच कामे शंभर टक्के पूर्ण करता आली. स्मार्ट सिटी योजनेच्या प्रारंभी हाती घेण्यात आलेले ‘एमएसआय’चे काम अद्याप प्रगतिपथावर आहे.’’ 

स्मार्ट सिटीच्या सुरुवातीला महापालिकेने सौर ऊर्जा प्रकल्पांवर जोर दिला. त्यात महापालिकेच्या मुख्यालयावर एकमेव प्रकल्प कार्यान्वित झाला. यासाठी आवश्‍यक मीटर न मिळाल्याने त्यातून तयार होणाऱ्या वीजेचा वर्षभर महापालिकेला फायदाच झाला नाही. त्यानंतर शहर डिजिटल व शहर बस सेवा सुरू करण्याचे प्रकल्प हाती घेण्यात आले. शहर बस रस्त्यावर उतरली पण शहर डिजिटल करण्यासाठी एमएसआयच्या कामांना म्हणावी तशी गती मिळाली नाही. या योजनेतून शहरात ७०० सीसीटिव्ही कॅमेरे, ५० डिस्प्ले बोर्ड, वाहतुकीचे नियम पाळले जावे याकरिता रस्त्यावर आयकॅट, झेब्रा क्रॉसिंग, वाहतुकीचे नियम दर्शविणारे फलक, ठिकठिकाणी मार्गदर्शविणारे फलक, सिसीटिव्हीवरुन वॉच ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तालय व महापालिकेत कमांड कंट्रोल रुम उभारणे आदी कामे यातून केली जाणार आहेत. त्याकरिता १७६ कोटींचा खर्च होणार आहे.

मात्र सध्या पोलिस आयुक्तालयातील कंट्रोल कंमाड रूम तयार आहे, सीसीटीव्ही बसविण्यासाठी पोल उभारण्याचे कामे सुरू आहेत. स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यातील ही कामे आहेत मात्र अद्याप ती शंभर टक्के पूर्ण झालेली नाहीत. सफारी पार्कचा शहरासाठी आवश्‍यक असलेला प्रकल्पदेखील स्मार्ट सिटीतून घेण्यात आला. वर्षभरानंतर आता निविदा प्रसिद्ध होणार आहेत. शहर बससाठी आता दीडशे अँड्रॉईड बेस ई-तिकिटींग मशीन खरेदी केल्या आहेत. दरम्यान, ऑनलाइन सेवेमध्ये महापालिका काळाच्या खूप मागे असल्याने स्मार्ट सिटी योजनेतून ४२ कोटी रुपये खर्च करून ई-गव्हर्नर्ससाठी निविदा काढली जाणार आहे. दरम्यान स्मार्ट सिटीच्या सीएचटूएम या पीएमसीने साथ सोडल्यानंतर कार्पोरेशन स्वतःच अधिकारी नियुक्त करून सर्व कामे करत आहे. महापालिकेसाठी आवश्‍यक असलेली अनेक कामे सुरवातीला स्मार्ट सिटीमध्ये घेण्यात आली नंतर ती वगळण्यात आली, त्यामुळे बराच वेळ वाया गेला. 

हे अपेक्षीत  

  • दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे. स्मार्ट क्लिनिकची संख्या वाढविणे. 
  • शहरातील त्या-त्या भागात भाजीपाला व अन्न पुरवठा करणारी साखळी तयार करणे. 
  • नागरिकांसाठी व्यवसाय प्रशिक्षण व मार्गदर्शन व संधी निर्माण करून देणे. 
  • स्मार्ट पार्किंगची व्यवस्था, पर्यटन वाढीसाठी चालना देणारे प्रकल्प. 

काय म्हणतात नागरिक...

 
समन्वयाचा अभाव 
 स्मार्ट सिटीतील कामांची गती बघता यशस्वी होणे अवघड दिसत आहे. निकष आणि तरतुदी सरकारने वेळोवेळी बदलल्यानेही मध्यंतरी संभ्रमावस्था होती. ना पदाधिकारी जागरूक होते ना अधिकारी. समन्वयाचा अभाव होता. दोन महिन्यात थोडा फरक जाणवतोय. जगण्यायोग्य शहर असावे एवढी साधी संकल्पना आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. : सारंग टाकळकर

अपेक्षित प्रगती नाही 
 स्मार्ट सिटीचे कामे वेग घेतील असे वाटत असतानाच कोविड आला. हा काळ सोडला तर चार वर्षात म्हणावी तशी प्रगती नाही. जी कामे सुरू आहेत ती तुकड्या-तुकड्यामध्ये सुरू आहेत. नागरिकांच्या स्मार्ट सिटीकडून असलेल्या अपेक्षा व स्मार्ट सिटीत सुरू असलेली कामे यात कुठेतरी ताळमेळ असावा. : अजय कुलकर्णी 

नियोजन व्हावे 
औरंगाबाद टुरिझम कार्पोरेशनचा अध्यक्ष या नात्याने जेव्हा स्मार्ट सिटीचा विचार करतो तेव्हा, कामात प्रगती जाणवत नाही. पर्यटक शहरात येतात तेव्हा त्यांना शहर स्वच्छ व सुंदर दिसले पाहिजे. त्यादृष्टीने नियोजन झाले पाहिजे. इंदूरसारख्या शहराने काय साध्य केले तेवढे औरंगाबादेत झाले तरी समाधान आहे.  : जसवंतसिंग 

अधिकारी म्हणतात... 

निधी वापरात आघाडीवर 
केंद्र आणि राज्य शासनाकडून आत्तापर्यंत ३६७ कोटींचा निधी मिळाला आहे, त्यांपैकी ३०२ कोटी रुपये विविध प्रकल्पांच्या माध्यमातून वापरात आणले आहेत. ही माहिती मंगळवारी केंद्र शासनाचे उपसचिव कुणालकुमार यांना एका बैठकीत देण्यात आली. औरंगाबाद निधी वापरात राज्यात पहिले शहर ठरले आहे असा उल्लेख कुणालकुमार यांनी केला. व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे झालेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय उपस्थित होते. - पुष्कल शिवम् (उपमुख्य कार्यकारी अधिकारी) 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com