महापालिका निवडणुका तीन महिने लांबणीवर; शासनाची निवडणूक आयोगाला विनंती

माधव इतबारे
Monday, 16 March 2020

राज्य शासनातर्फे आगमी सर्वच निवडणुका किमान तीन महिने पुढे ढकलण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाला करण्यात आली. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यामुळे महापालिकेची निवडणूक तीन महिने लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

औरंगाबाद : कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, राज्यातील सर्वच निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्याची विनंती सरकारने निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात होणारी महापालिका निवडणूक देखील लांबणीवर पडण्याची शक्यता बळावली आहे. यासंदर्भात एक-दोन दिवसात महापालिकेला आदेश प्राप्त होतील, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. 

महापालिकेची एप्रिल २०२० मध्ये निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेने तयारी पूर्ण केली आहे. २० मार्चपर्यंत निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या राज्यात वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाने शाळा, महाविद्यालये, मॉल, संग्रहालये बंद ठेवण्यासोबतच जमावबंदी आदेश लागू केले आहेत. अशा वातावरणात महापालिकेच्या निवडणुका कशा घेणार असा प्रश्‍न उपस्थित केला जात होता.

खासदार इम्तियाज जलील यांनी महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षांना सभा घेण्यास परवानगी मिळणार नसेल तर निवडणुकीत प्रचार कसा करायचा?असा प्रश्‍न करत निवडणुका लांबणीवर टाकून महापालिकेवर प्रशासक नियुक्त करावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्य निवडणूक आयोगाला पत्र देऊन निवडणुका लांबणीवर टाकण्यात याव्यात व विद्यमान नगरसेवकांना सहा महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी केली. औरंगाबाद महापालिकेसोबतच नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होत असून, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील अशीच मागणी राज्य शासनाकडे केली.

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

यापार्श्‍वभूमीवर सोमवारी (ता. १६) राज्य शासनातर्फे आगमी सर्वच निवडणुका किमान तीन महिने पुढे ढकलण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाला करण्यात आली. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यावर राज्य निवडणूक आयोगाने अद्याप निर्णय घेतला नसला तरी कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढतच असल्यामुळे महापालिकेची निवडणूक तीन महिने लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

प्रशासक होणार नियुक्त 
महापौर नंदकुमार घोडेले यांनी विद्यमान नगरसेवकांना सहा महिन्याची मुदतवाढ देण्याची मागणी केली असली तरी कायद्यात तशी तरतूद नसल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे २९ एप्रिलला विद्यमान महापौरांची मुदत संपताच महापालिकेवर प्रशासक नियुक्त होईल, असे सूत्रांनी सांगितले.

क्‍लिक करा : मतदार यादीत घोळ घालणारे चार कर्मचारी निलंबित 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal Election