इथे हाेणार तब्बल 52 एकरांत गृह प्रकल्प

amc aurangabad
amc aurangabad

औरंगाबाद- गेल्या साडेचार वर्षांपासून रखडलेल्या महापालिकेच्या गृह प्रकल्पासाठी तीसगाव शिवारातील जागा अंतिम करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी येथील 52 एकर जागा घरकुल प्रकल्पासाठी देण्यास सहमती दर्शविली असून, त्यानुसार महापालिका डीपीआर तयार करणार आहे. त्यामुळे सुमारे 15 हजार बेघरांचे घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. 

केंद्र शासनातर्फे सर्वांना हक्काची घरे देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे; मात्र गेल्या साडेचार वर्षांत गृह प्रकल्पासाठी जागाच अंतिम होत नव्हती. सुरवातीला मिटमिटा येथे 50 एकर जागा देण्यात आली; मात्र यालगतच सफारी पार्क विकसित केले जात असल्याने त्याशेजारी गर्दी नको म्हणून, विभागीय आयुक्‍तांनी आक्षेप घेतला व येथील प्रकल्प रद्द करण्यात आला. त्यानंतर महापालिकेने चिकलठाणा, करोडी आणि तीसगाव येथील जागांची पाहणी केली.

आयुक्‍त अस्तिककुमार पांडेय यांनी तीसगावात सुमारे 250 एकर जमीन उपलब्ध असून, तेथे 15 हजार पेक्षा जास्त घरं तयार करणं सोयीचं होणार आहे, असे सांगत याच जागेसाठी आग्रह धरला होता. दरम्यान, औरंगाबाद दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान आवास योजनेचे प्रस्ताव मार्गी लावण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी विभागीय आयुक्तांनी लवकरात लवकर जागा अंतिम केली जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांना दिले.

त्यानंतर महापालिकेने तीसगाव येथील जागा प्रकल्पासाठी मिळावी असा प्रस्ताव जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने जागा देण्याची सहमती दर्शविल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. 24) आढावा बैठकीत महापौर नंदकुमार घोडेले यांना दिली; पण येथे 52 एकर जागाच मिळणार आहे. त्यामुळे उर्वरित घरांसाठी महापालिकेला जागेचा शोध घ्यावाच लागणार आहे. 
 
कांचनवाडी, ब्रिजवाडीतही विचार 
गृह प्रकल्पांसाठी महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या कांचनवाडी व ब्रिजवाडी येथील जागांचा विचार सुरू आहे. यासंदर्भात प्रशासनाला सूचना करण्यात आल्या असल्याचे महापौर श्री. घोडेले यांनी सांगितले. ब्रिजवाडी येथे 22 एकर तर कांचनवाडीत तीन एकर जागा उपलब्ध आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com