कोरोनाच्या नावाखाली वाटले चार कोटी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

प्रशासनाने तीन कोटी ९९ लाख रुपयांची बिले काढली असून, त्यात महापालिकेत अत्यावश्‍यक कामे करणाऱ्या कंत्राटदारांचा समावेश आहे. ही बिले कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेची मदत व्हावी, यासाठी काढण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

औरंगाबाद : शहरात विकासकामे करणाऱ्या कंत्राटदारांचे महापालिकेकडे कोट्यवधी रुपये थकीत आहेत. ही थकबाकी मिळावी म्हणून कंत्राटदारांनी पदाधिकारी, आयुक्तांकडे वारंवार खेट्या मारल्या. मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली. दरम्यान, प्रशासनाने तीन कोटी ९९ लाख रुपयांची बिले काढली असून, त्यात महापालिकेत अत्यावश्‍यक कामे करणाऱ्या कंत्राटदारांचा समावेश आहे. ही बिले कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेची मदत व्हावी, यासाठी काढण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

सुमारे अडीचशे कोटी रुपये कंत्राटदारांची देणी असल्याचे गेल्या सहा महिन्यांपासून सांगितले जात आहे. महापालिकेकडे कोट्यवधी रुपयांची बिले थकल्यामुळे कंत्राटदारांनी नवी कामे न करण्याचा निर्णय घेत, महापालिका मुख्यालयासमोर उपोषणदेखील केले. तत्कालीन आयुक्तांनी, पदाधिकाऱ्यांनी त्यांना वारंवार आश्‍वासने दिली. मात्र बिले काही निघाली नाहीत. दरम्यान, पदभार घेताच आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी टप्प्या-टप्प्याने बिले दिली जातील, असे आश्‍वासन दिल्यानंतर कंत्राटदारांनी माघार घेतली. त्यानंतर आयुक्तांनी या संपूर्ण कामांची तपासणी करण्याचे आदेश दिले.

प्रभागनिहाय नियुक्त अधिकाऱ्यांनी झालेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करावा, असे आदेश आयुक्तांनी देताच कंत्राटदारांची अडचण वाढली. दरम्यान, अनेक कामांच्या एमबी (मेजरमेंट बुक) नसल्याचेदेखील समोर आले. ज्या अधिकाऱ्यांच्या ताब्यातून एमबी गायब झाल्या त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी काढले. त्यामुळे बिलांचा विषय लांबणीवर पडत गेला. दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेला विविध अत्यावश्‍यक कामे करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे तब्बल तीन कोटी ९९ लाख रुपयांची बिले लेखा विभागाने काढली आहेत. 

वीज, पाण्याला प्राधान्य 
लॉकडाऊनमुळे शहरात चोऱ्या वाढण्याची भीती व्यक्त करत पोलिसांनी संपूर्ण पथदिवे सुरू ठेवण्याची सूचना महापालिकेला केली आहे. त्यामुळे पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती, पाणीपुरवठ्यासंबंधी मेंटेनन्सची कामे करणारे कंत्राटदार, उद्यान, नालासफाई करणाऱ्या कंत्राटदारांची बिले देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal News