महापालिकेवर प्रशासक  नियुक्तीची शिफारस 

माधव इतबारे
Thursday, 23 April 2020

पाच वर्षांची मुदत लवकरच संपणार असल्याने प्रशासक नियुक्तीची कार्यवाही करावी, असे पत्र राज्य निवडणूक आयोगाने नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहे. 

औरंगाबाद : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे औरंगाबादसह राज्यातील तीन महापालिका, आठ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली. येथील सदस्यांची पाच वर्षांची मुदत लवकरच संपणार असल्याने प्रशासक नियुक्तीची कार्यवाही करावी, असे पत्र राज्य निवडणूक आयोगाने नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहे. 

कोरोना विषाणूमुळे राज्य निवडणूक आयोगाने सर्वच निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद महापालिकेतील नगरसेवकांची मुदत २८ एप्रिलला संपणार असून, प्रशासक नियुक्त होणार का? महापौर, उपमहापौरांना महापालिका अधिनियमानुसार पुढील महापौर, उपमहापौरांची निवड होईपर्यंत पदावर राहता येईल? याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र दिले आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठीक्लिक करा

औरंगाबाद, नवी मुंबई, वसई-विरार या तीन महापालिका, कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ, राजगुरूनगर, भडगाव, वरणगाव, भोकर, मोवाड व वाडी या आठ नगरपालिका, केज नगर पंचायतीची मुदत नजीकच्या काळात संपत आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कधी संपेल याचा अंदाज नसल्याने या निवडणुका त्यांची मुदत संपण्यापूर्वी घेणे शक्य वाटत नाही. महाराष्ट्र महापालिका अधिनियमाचे कलम ६ व महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ४१ नुसार निवडून आलेल्या सदस्यांची मुदत ही पहिल्या बैठकीपासून जास्तीत जास्त पाच वर्षांची असल्याने ती पुढे ठेवणे योग्य होणार नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची जेव्हा मुदत संपेल, तेव्हा त्या ठिकाणी प्रशासक नियुक्तीची कार्यवाही करावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

अशी आहे मुदत 
औरंगाबाद महापालिका- २८ एप्रिल २०२० 
नवी मुंबई महापालिका- ०७ मे २०२० 
वसई-विरार महापालिका - २८ जून २०२० 
कुळगाव-बदलापूर नगर परिषद- १९ मे २०२० 
अंबरनाथ नगर परिषद- १९ मे २०२० 
राजगुरूनगर (पुणे) नगर परिषद- १५ मे २०२० 
भडगाव (जळगाव) नगर परिषद- २९ एप्रिल २०२० 
वरणगाव (जळगाव) नगर परिषद- ५ जून २०२० 
भोकर (नांदेड) नगर परिषद- ९ मे २०२० 
मोवाड (नागपूर) नगर परिषद- १९ मे २०२० 
वाडी (नागपूर) नगर परिषद- १९ मे २०२० 
केज (बीड) नगर पंचायत- १ मे २०२० 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal News