नगरसेविकेने लावले पाण्याच्या टाकीला कुलूप

माधव इतबारे
मंगळवार, 14 जानेवारी 2020

वारंवार फुटणारी पाइपलाइन, गळत्या यामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत आहे. पुंडलिकनगर वॉर्डात सोमवारी पाण्याचा दिवस होता; मात्र पाणी आले नाही. त्यामुळे नागरिकांनी दोन-तीन तास पाण्याची वाट पाहून आपला मोर्चा नगरसेविका गायके यांच्या घरी वळविला. त्यानंतर हे आंदोलन करण्यात आले.

औरंगाबाद- महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना शिवसेनेच्या नगरसेवकांवरच आंदोलन करण्याची वेळ येत आहे. सोमवारी (ता. 13) पुंडलिकनगरच्या नगरसेविका मीना गायके यांनी पाण्यासाठी टाकीला कुलूप ठोकून आंदोलन केले. त्यानंतर सायंकाळी त्यांच्या भागात पाणीपुरवठा करण्यात आला. 

हेही वाचा : घरात इलेक्‍ट्रिशियन कामाला आला रॅक सरकवले मग वाचा झाले काय 

नाथसागर काठोकाठ तरीही...
नाथसागर काठोकाठ भरलेला असला तरी शहरातील पाणीप्रश्‍न अद्याप संपलेला नाही. वारंवार फुटणारी पाइपलाइन, गळत्या यामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत आहे. पुंडलिकनगर वॉर्डात सोमवारी पाण्याचा दिवस होता; मात्र पाणी आले नाही. त्यामुळे नागरिकांनी दोन-तीन तास पाण्याची वाट पाहून आपला मोर्चा नगरसेविका गायके यांच्या घरी वळविला. त्यांनी अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी पुंडलिकनगर येथील पाण्याच्या टाकीवर धाव घेतली. या ठिकाणी एक वॉचमन ड्युटीवर होता. त्यामुळे विचारणा कोणाकडे करायची, असा प्रश्‍न श्रीमती गायके यांना पडला. अधिकाऱ्यांना गांभीर्य नसल्याने गायके यांचा पारा चढला. त्यांनी वॉचमनकडून कुलूप घेऊन पाण्याच्या टाकीच्या प्रवेशद्वाराला लावले. त्यानंतर चावी घेऊन त्या घरी निघून गेल्या. गायके यांनी गेटला कुलूप ठोकल्याची माहिती मिळाल्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी गायके यांच्या घरी दाखल झाले. पाणी देण्याची ग्वाही दिल्यावर गायके यांनी त्यांना चावी दिली. दरम्यान, दुपारी चार वाजेच्या सुमारास पुंडलिकनगरमध्ये पाणीपुरवठा करण्यात आला. या आंदोलनात शिवसेनेचे नगरसेवक आत्माराम पवार यांनीही सहभाग घेतला. 

क्‍लिक करा : रुग्ण दगावला..घाटीत नातेवाईकांची तोडफोड 

आयुक्त आजारी, पदाधिकाऱ्यांनी केले बेदखल 
यासंदर्भात श्रीमती गायके यांनी सांगितले, की पुंडलिकनगरात पाण्यासाठी मी वारंवार सर्वसाधारण सभेत विषय मांडला. अनेकवेळा आंदोलन केले; पण उपयोग झाला नाही. सहा दिवसांपासून वॉर्डात पाणीपुरवठा झाला नाही. सोमवारी पाणीपुरवठा होणार होता; पण तो झाला नाही. त्यामुळे जाब विचारण्यासाठी टाकीवर गेले होते. त्या ठिकाणी अधिकारी नव्हते. त्यामुळे प्रवेशद्वाराला कुलूप लावून किल्ली घरी आणली आयुक्तांना फोन केला तर ते आजारी असल्याचे सांगण्यात आले. महापौर, सभागृहनेत्यांना आंदोलनाची माहिती दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipality Carporator locked the water tank