टीव्हीलाही यायच्या ‘मुंग्या’! जुन्या मालिका पाहताना आठवणी ताज्या 

File Photo
File Photo

औरंगाबाद ः एखादा व्यक्ती एकाच जागेवर बराच वेळ बसला किंवा हातापायाच्या एखाद्या शिरेवर दाब पडला तर हात-पाय सुन्न होतात. त्यालाच मुंग्या येणे म्हणतात. शिवाय मानेच्या मणक्यामधील अंतर कमी-जास्त झाल्यास हातांच्या बोटांना मुंग्या येतात.

ही झाली शारीरिक दुखणी. पण कोणे एकेकाळी टीव्हीलासुद्धा...हो हो टीव्हीलाही ‘मुंग्या’ यायच्या! अर्थात तो तेव्हाचा ‘टेक्निकल प्रॉब्लेम’ असायचा. विशेषतः तेव्हा रामायण, महाभारत या लोकप्रिय मालिका पाहताना आलेल्या अशा ‘मुंग्या’ आता लॉकडाऊनच्या काळात या मालिका पुन्हा पाहताना अनेकांना आठवत असतील! ‘रुकावट के लिये खेद है’ हे वाक्यही त्यातलेच! 

‘दूरदर्शन’ आले प्रकाशझोतात 

देशात जानेवारी १९५० मध्ये तेव्हाच्या मद्रासमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने एक प्रदर्शन भरविले होते. त्यात एक पत्र स्कॅन केले गेले आणि त्याची प्रतिमा टेलीव्हिजन सेटवरील कॅथोड रे ट्यूब स्क्रीनवर प्रदर्शित झाली.

तथापि, तो संपूर्ण टीव्ही नव्हता पण या प्रणालीमधील देशात घडलेली ती महत्त्वाची घटना असल्याचा दावा तेव्हा केला गेला होता. नंतर ‘दूरदर्शन’ सेवेत रूजू झाले. सुरवातीला देशात फक्त ७ शहरांमध्ये टीव्ही सेवा होती आणि ‘दूरदर्शन’ एकमेव वाहिनी होती. १८८२ च्या आसपास रंगीत संच आले अर्थात ते काही निवडक शहरांच्या ठिकाणीच होते. 

दूरदर्शन खरे प्रकाशझोतात आले ते, १९८७ च्या दरम्यान ‘रामायण’ अन् नंतरच्या ‘महाभारत’ या मालिकांमुळे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

‘मुंग्यां’मुळे यायचे टेंशन! 

त्यावेळी खेडेगावी मोजक्याच दोन-चार लोकांच्या घरी टीव्ही असायचे. रामायण, महाभारत, जंगल बुकचा मोगली, चंद्रकांता, शक्तीमान या अत्यंत लोकप्रिय मालिका होत्या. त्यातल्या त्यात रामायण, महाभारत पाहण्यासाठी तर प्रचंड गर्दी व्हायची. मालिका सुरू झाल्यावर कधी कधी पाच ते दहा मिनीटातच टीव्ही स्क्रीनवरील दृश्‍य नाहीसे व्हायचे आणि मुंग्या आल्यासारखे वाटायचे.

नेमके राम-लक्ष्मण धनुष्यातून बाण मारत असताना...शक्तिमान उडी घेत असताना किंवा मोगलीच्या मागे लागलेला ‘जंगल का राजा’ त्याच्यावर झडप घालण्याच्या तयारीत असताना अशा ‘मुंग्या’ आल्या की गावकऱ्यांच्या मनाची घालमेल व्हायची. कधी कधी उभ्या- आडव्या पट्ट्याही यायच्या.

‘रूकावट के लिये खेद है’ आल्यावर मग एकजण लगेच गच्चीवर जाऊन अँटेना फिरवायचा! आले का...? दिसते का...? नाही अजून...इकडे फिरव अँटेना...आता तिकडे फिरव...आता चित्र आले रे...असे संवाद तेव्हा गावोगावी ऐकायला यायचे. पाच-दहा मिनिटे हा प्रकार चालायचा. 


का यायच्या ‘मुंग्या’? 

याबाबत या क्षेत्रातील तज्ज्ञ मनोज संतान्से यांनी सांगितले, की त्या काळात टीव्हीचे सिग्नल ॲनालॉग पद्धतीचे असायचे. दळणवळण क्षेत्रात देशाची प्रगती झालेली नव्हती. अँटेना साधे होते. इतर देशांच्या सॅटेलाईटवर काम चालायचे.

कधी बिघडलेले वातावरण, तर कधी तांत्रिक समस्यांमुळे ॲनालॉग सिग्नलमध्ये गडबडी व्हायच्या आणि मग सुरू व्हायचा ‘मुंग्यांचा खेळ’. यामुळे गावकरी मात्र हैराण व्हायचे. नंतरच्या काळात अधिक शक्तिशाली दळणवळण उपग्रह भारताने स्वतःच अवकाशात पाठविले. ॲनालॉग मागे पडून डीजीटल पद्धत आली. त्यामुळे या ‘मुंग्या’ इतिहासजमा झाल्या. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com