मुकुंदवाडीत फोडले देशी दारूचे दुकान, काही तासांत पोलिसांनी चार संशयितांना पकडले

सुषेन जाधव
Thursday, 21 January 2021

संशयित आरोपींपैकी प्रशांत शिरोसिया याचे वाइन शॉप होते. मात्र, भावकीच्या वादात ते बंद पडले.

औरंगाबाद : देशीदारूचे दुकान फोडून दारूच्या बॉक्ससह सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास केल्याचा प्रकार गुरुवारी (ता. २१) सकाळी समोर आला. पुंडलिकनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच चार संशयितांना बेड्या ठोकल्या. भगवान वसंतराव जैस्वाल (रा. मुकुंदवाडी परिसर), पवन विजय जातेकर (३१), गणेश सखाहरी गवळी (२९, रा. दोघेही चेलीपुरा परिसर), प्रशांत दत्तप्रसाद शिसोरिया (४०, रा. केळीबाजार) अशी त्या संशयितांची नावे आहेत. चोरांनी दुकान फोडून लंपास केलेले देशी दारूच्या २८ बॉक्ससह, एक छोटा हत्ती वाहन असा २ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांनी गुरुवारी (ता.२१) दिली. 

हृदयविकाराच्या झटक्याने जवानास वीरमरण, देशसेवेसाठी सेवाकाळ घेतला होता वाढवून

या प्रकरणी नितेश सुरेशलाल जैस्वाल (रा. नारेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते मुकुंदवाडी रेल्वेस्थानक परिसरातील देशीदारूच्या दुकानावर व्यवस्थापक आहेत. बुधवारी नेहमीप्रमाणे दुकान बंद केल्यानंतर ते घरी गेले. दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता.२१) सकाळी दुकान उघडण्यास आले असता त्यांचे दुकान फोडून २८ देशी दारूचे बॉक्ससह सीसीटीव्ही डीव्हीआर चोरून नेल्याची उघडकीस आले. 

 

ग्रामपंचायतला पडली 'बारा' मते... मग पठ्ठ्याने बॅनर लावून मानले मतदारांचे 'जाहीर आभार'

अवघ्या काही तासातच संशयित जेरबंद 
गुन्हा नोंद झाल्यावर सहाय्यक पोलिस निरीक्षक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धनाजी आढाव, पोलिस अंमलदार रमेश सांगळे, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, प्रवीण मुळे,राजेश यदमळ,जालिंदर मांन्टे, कल्याण निकम, दीपक जाधव, अजय कांबळे, स्वाती राठोड यांच्या पथकाने अवघ्या काही तासात चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. 

वाइन बंद पडल्यानंतर करायचा ‘असले’ धंदे 

संशयित आरोपींपैकी प्रशांत शिरोसिया याचे वाइन शॉप होते. मात्र, भावकीच्या वादात ते बंद पडले. तेव्हापासून तो चोरीच्या देशीदारू खरेदी करीत असे. त्यामुळे आजवर दारूची दुकाने फोडीच्या प्रकरणात शिरोसिया याचा हात आहे का याचा आम्ही तपास करीत असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. विशेष म्हणजे जैस्वाल यांचे याआधी तब्बल तीन वेळा दुकान फोडीचा प्रकार झाला होता, त्या मागेही हेच संशयित असू शकतील अशी शक्यता सोनवणे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. 
 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad News Country Made Liquor Shop Broken