रस्त्यांमध्येही लपवाछपवी!

माधव इतबारे
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

रस्त्यांच्या निधीची घोषणा करताना राज्य शासनाने रस्त्यांची संख्या, अंतर, कोण किती रस्ते करणार याची माहिती जाहीर केली आहे; मात्र कोणते रस्ते होणार हे जाहीर केलेले नाही. यासंदर्भात आयुक्त, महापौरांकडे विचारणा केली असता, लवकरच यादी जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले. निधी जाहीर होऊन तीन दिवस झाले तरी रस्त्यांची यादी समोर येत नसल्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे.

औरंगाबाद - राज्य शासनाने शहरातील रस्त्यांसाठी १५२ कोटींच्या निधीची घोषणा दोन दिवसांपूर्वी केली आहे. त्यातून २० रस्त्यांची कामे केली जाणार असली तरी नेमक्या कोणत्या रस्त्यांची निवड करण्यात आली? हे अद्याप समोर आलेले नाही. पदाधिकाऱ्यांनी वशिलेबाजी करून आपल्या भागातील रस्त्यांचा समावेश तर केला नाही ना? त्यामुळेच यादीची लपवाछपवी केली जात आहे का? असा संशय नगरसेवकांमधून व्यक्त केला जात आहे. 

कुठं सापडलं जळालेल्या अवस्थेतलं प्रेत...

प्रत्येकवेळी यादीवरून मोठा वाद 
शहरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाल्यामुळे महापालिकेची संपूर्ण देशात बदनामी झाली होती. त्यानंतर राज्य शासनाने महापालिकेला दिलासा देत मोठा निधी दिला. पहिल्या टप्प्यात २५ कोटी त्यानंतर १०० कोटी व आता १५० कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे. त्यातून अनुक्रमे सहा, ३० व २० रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत. मात्र हा निधी मिळण्यापूर्वी प्रत्येकवेळी यादीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. दरम्यान, यावेळी तब्बल १०३ रस्त्यांची यादी शासनाला देण्यात आली होती. यातील केवळ २० रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. रस्त्यांच्या निधीची घोषणा करताना राज्य शासनाने रस्त्यांची संख्या, अंतर, कोण किती रस्ते करणार याची माहिती जाहीर केली आहे; मात्र कोणते रस्ते होणार हे जाहीर केलेले नाही. यासंदर्भात आयुक्त, महापौरांकडे विचारणा केली असता, लवकरच यादी जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले. निधी जाहीर होऊन तीन दिवस झाले तरी रस्त्यांची यादी समोर येत नसल्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे. 
रस्त्यांची निवड करताना पदाधिकारी वशिलेबाजी करतात. आपल्या भागातील रस्त्यांचा समावेश करण्यासाठी स्पर्धा असते. यावेळी देखील पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागातील रस्ते निवडले असतील, त्यामुळेच यादी समोर येत नसल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. 

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

शनिवारचा निवडला मुहूर्त 
रस्त्यांसाठी निधी जाहीर होऊन तीन दिवस उलटले तरी आयुक्त मुंबईतच ठाण मांडून होते. आयुक्त शहरात आल्यानंतर शनिवारी (ता. २२) ते १५२ कोटींतून कोणते रस्ते होणार हे जाहीर करतील, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. दरम्यान, या रस्त्यांमध्ये विकास आराखड्यातील रस्त्यांचाच समावेश असल्याचे सांगितले जात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad news Doubt when making road work list