रिव्हॉल्व्हर रोखून कुरिअर व्यवस्थापकाचा भरदिवसा खून 

मनोज साखरे
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

तोंडाला रुमाल बांधलेली व हातात रिवॉल्वर घेऊन एकजण आत आला. हे पाहून प्रकाशभाईचा सहकारी आतल्या खोलीत घाबरुन पळाला तर दुसरा आधीच स्वच्छतागृहात गेला होता. आत घुसलेल्या मारेकऱ्याने प्रकाशभाईला रिव्हॉल्वरचा धाक दाखवत बाहेर चलण्याचा इशारा केला. प्रकाशभाई कार्यालयातून बाहेर पडताना काही कळण्याच्या आतच त्यांच्या पोटात हल्लेखारांनी चाकु खुपसला.

औरंगाबाद : गुलमंडीसारख्या गजबजलेल्या परिसरातील नगारखाना गल्लीत शुक्रवारी (ता. 31) भरदुपारी खुनाचा थरार घडला. गुजरातेतील कुरिअर कंपनीच्या व्यवस्थापकाला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तिघांनी त्यांचा चाकूनेभोसकून खून केला.

ओळख पटू नये म्हणून हल्लेखोर तोंडावर काळे रुमाल घालून आले होते. ही खळबळजनक घटना हवालाच्या आर्थिक संबंधातून झाल्याची माहिती समोर येत आहे. ही सर्व घडामोड दुपारी सव्वाबारानंतर केवळ चार ते पाचच मिनिटांत घडली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनूसार, प्रकाशभाई जसवंतभाई पटेल (वय, 33 मुळ रा. बोडला, जि. मेहसाना, गुजरात, ह. मु. नगारखाना गल्ली, औरंगाबाद) असे मृत व्यवस्थापकाचे नाव आहे.

नगारखाना गल्लीतीत एका इमारतीमध्ये ते राहत होते. रामाभाई मोहनदास अँड कंपनी या कुरीयर सर्वीस देणाऱ्या कंपनीने तीन रुमचा एक ब्लॉक याच भागात किरायाने घेतला होता.

या कुरीयर कंपनीचेच अजून एक कार्यालय समोरील एका इमारतीत पहिल्या मजल्यावर आहे. तेथे प्रकाशभाई उर्फ कमलेश पटेल दीड वर्षांपासून व्यवस्थापक होते.

शुक्रवारी दुपारी प्रकाशभाई व त्यांच्यासोबतचे दोन सहकारी कार्यालयात बसले होते. सव्वाबारानंतर तोंडाला रुमाल बांधलेली व हातात रिवॉल्वर घेऊन एकजण आत आला. हे पाहून प्रकाशभाईचा सहकारी आतल्या खोलीत घाबरुन पळाला तर दुसरा आधीच स्वच्छतागृहात गेला होता.

आत घुसलेल्या मारेकऱ्याने प्रकाशभाईला रिव्हॉल्वरचा धाक दाखवत बाहेर चलण्याचा इशारा केला. प्रकाशभाई कार्यालयातून बाहेर पडताना काही कळण्याच्या आतच त्यांच्या पोटात हल्लेखारांनी चाकु खुपसला. यात ते रक्तबंबाळ झाले.

याच अवस्थेत ते जीवाच्या आकांताने सुमारे पन्नास फुट अंतरापर्यंत पळत सुटले व अन्य एका कार्यालयात गेले. तिथेच ते रक्ताच्या थारोळ्यात धाडकन पडले. प्रकाशभाईना पाहून सर्वजण हादरुन गेले. लगेचच त्यांना कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीसह गल्लीतील नागरिकांनी तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 
चौकटी 

मारेकरी पायी आले, दुचाकीवरुन गेले 

मारेकरी ट्रिपलसीट गोकुळनाथ मोहल्लामार्गे नगारखाना गल्लीत आले. दुचाकी एका ठिकाणी उभी करुन ते पायी प्रकाशभाईच्या कार्यालयात गेले. खून करुन त्यांनी दुचाकीकडे धाव घेतली. त्यानंतर ते गोकुळनाथ मोहल्ल्याकडून रामेश्वर मंदिराकडे जात असलेल्या रस्त्यावर वळण घेत निघून गेले. 

हवाला व्यवहारातून खून 

सुत्रांनी सांगितले की, कुरीअरद्वारे हवालाच्या पैशांची वाहतूक केली जात होती. या ठिकाणाहुन विविध ठिकाणी पैशांची पोचही करण्यात येत होती. त्याच व्यवहारातून वाद झाला व त्याचे पर्यावसन खुनात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

खुनाच्या या दोन शक्‍यता 

प्रकाशभाई काम करीत असलेली कुरीयर कंपनी हवालामार्फत रक्कम पाठवण्याचे काम करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. या कंपनीच्या कार्यालयात मोठी रक्कम असल्याची शक्‍यता आहे.

हल्लेखोरांचा प्रकाशभाईशी वाद झाला पण त्यांना ठार मारायचे होते हेही एक कारण असु शकते किंवा मोठे घबाड मिळविण्यासाठी ते आले असावे अशा दोन शक्‍यता वर्तविण्यात येत आहेत. 

मारेकरी सीसीटीव्हीत कैद 

घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्हीची पाहणी केली, त्यावेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मारेकरी कैद झाल्याचे दिसून आले. तीन मारेकऱ्यांनी तोंडाला कपडा बांधला होता. त्यांनी प्रकाशभाईंच्या दिशेने रिव्हॉल्वहर रोखल्याचेही फुटेज दिसून आले आहे. हे फुटेज पोलिसांनी जप्त केले आहे. 

प्रकाशभाई दोन 
वर्षांपासून शहरात 

गुजरातेतील प्रकाशभाई औरंगाबादेत दोन वर्षांपूर्वी आले होते. त्यांचा विवाह झालेला असून पत्नी व सहा वर्षांच्या मुलीसह ते नगारखाना गल्लीतच राहत होते. कुरीअरच्या निमित्ताने त्यांचे गुजरातेत नेहमी जाणे-येणे होते. त्यांच्या खूनप्रकरणी सिटीचौक पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.  

हेही वाचा - 

एका क्‍लिकवर वाचा औरंगाबादची गुन्हेगारी     

नाशिकच्या मुलीसोबतही झाला होता तो प्रकार!

याच्यावर आहे चाळीसपेक्षा अधिक गुन्हे औरंगाबादेतून चोरले होते सत्तर तोळे सोने 

चौघींच्या दादल्याने टाकले एकीच्या खात्यात 14 लाख अन..मग असं झालं 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad NEWS Murder Of Courier Manager