अहो..! ‘कला’ विषयाचे नाव ‘चित्रकला’ ठेवा 

teacher.jpg
teacher.jpg

औरंगाबाद : ‘‘कोठारी आयोगापासून शालेय शिक्षणातील भाषा, गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्र हे मुख्य विषय म्हणून निश्‍चित झाले, तर चित्रकला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण हे पूरक विषय म्हणून गणले होते. मात्र १९८६ च्या शैक्षणिक धोरणात चित्रकलेचे नामांतर ‘कला’ करण्यात आले. 

यामध्ये चित्रकलेसह नृत्य, नाट्य, गायन, वादन या कलांचीही भर घालण्यात आली. परिणामी, चित्रकलेचे महत्त्व कमी झाले. त्यामुळे कलाशिक्षकांच्या रिक्त पदांची भरती थांबली असून, अंशकालीन कलाशिक्षकांचीही हेळसांड होत असल्याचे मत महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाचे विभागीय उपाध्यक्ष विश्वनाथ ससे यांनी व्यक्त केले.’’ 

सध्याच्या शालेय शिक्षण धोरणात कला हा विषय तर फक्त नावापुरता शिल्लक आहे. नव्या शैक्षणिक धोरणात प्राथमिक शिक्षण मातृभाषेत, मुलांचे कौशल्य, क्षमता विकासावर भर देण्यात आला आहे. तसेच अध्यापनकार्यात अडचण येणार नाही, यासाठी शिक्षणावर सहा टक्के खर्चाचा उल्लेख करण्यात आला आहे. नव्या धोरणात कला, क्रीडा, संगीत, योग, समाजसेवा या विषयांना अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा उल्लेख असल्याने कला विषयाबाबत संभ्रम आहे. त्यामुळे मुख्य विषय वगळता पूरक विषयांना दुय्यम स्थान दिल्याचे दिसत आहे.

चित्रकलेला भारतात प्राचीन परंपरा आहे. कोणत्याही विषयाचे नवीन ज्ञान दृश्‍य स्वरूपातील चित्र, आकृतींतून अधिक समजते. चित्रकला विषय स्वतंत्र अस्तित्वाशिवाय इतर विषयांनाही पूरक आहे. शालेय वातावरण मुलांच्या दृष्टीने आनंददायी, कृतिशील, उपक्रमशील, नवनिर्मितीपूरक ठेवण्यासाठी चित्रकला अनिवार्य आहे. शालेय स्तरावरचे विषय पुढे उच्चशिक्षण रूपाने सखोल, विस्तारणारे आहेत. त्यामुळे केवळ छंद, मनोरंजन म्हणून याकडे न पाहता रचनेचा व्यापक दृष्टिकोन देणारी कला म्हणून पाहावे, मत श्री. ससे यांनी व्यक्त केले आहे. 

असे बदल अपेक्षित 

- विषयाचे नाव कलाऐवजी चित्रकला ठेवावे. 
- यासाठी स्वतंत्र कलावर्ग, पूरक साहित्य उपलब्ध करावे. 
- चित्रकला शिक्षक पदवीधारकच हवा, अंशकालीन नको. 
- इतर विषयांप्रमाणे चित्रकलेचेही पाठ्यपुस्तक असावे. 
- पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळात विशेषपदी शिक्षणतज्ज्ञच हवा. 
- चित्रकला ग्रेड परीक्षांकडे गांभीर्याने पाहावे. 
- चित्रस्पर्धेचे विषय ठरवताना कलाशिक्षकांचा सल्ला घ्यावा. 
- प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कलेचे स्वतंत्र कलाभुवन असावे. 
- कला संचालनालयात कला संचालकपदी चित्रतज्ज्ञ नेमावा. 

(संपादन-प्रताप अवचार) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com