corona : औरंगाबादचा हा पॅटर्न आता देशभरात... केंद्र शासनाने काढले आदेश

माधव इतबारे
Saturday, 8 August 2020

केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशाच्या प्रमुखांना त्यांच्या क्षेत्रातील व्यापारी व विक्रेत्यांची कोरोना चाचणी करून घेण्याबद्दल कळवले आहे.

औरंगाबाद ः शहरातील व्यापारी आणि विक्रेत्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय महापालिकेने जुलै महिन्यात घेतला होता. आता हा औरंगाबाद पॅटर्न देशभर पोचला आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी व्यापारी व विक्रेत्यांची कोरोना चाचणी करावी असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिले आहेत. 

शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यानंतर १० ते १८ जुलै दरम्यान लॉकडाऊनची काटेकोरपणे अमंलबजावणी करण्यात आली. त्यानंतर प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी शहरातील व्यापारी व विक्रेत्यांची अॅन्टीजेन चाचण्या करण्याचा निर्णय घेतला. जे व्यापारी चाचण्या न करता आस्थापना उघडतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आल्याने सुरुवातीला व्यापाऱ्यांनी विरोध केला. त्यानंतर ठरावीक वेळ देण्यात आल्याने व्यापाऱ्यांचा विरोध मावळला.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

दरम्यान मोठ्या संख्येने चाचण्या करण्यात आल्याने त्याचे परिणाम देखील दिसून आले. सध्या औरंगाबाद शहरातील करोनाची स्थिती नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. औरंगाबाद महापालिकेचा हा फॉर्म्युला केंद्र सरकारने स्वीकारला आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशाच्या प्रमुखांना त्यांच्या क्षेत्रातील व्यापारी व विक्रेत्यांची कोरोना चाचणी करून घेण्याबद्दल कळवले आहे. औरंगाबाद महापालिकेची संकल्पना आता देशपातळीवर राबविली जाणार असल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

या उपक्रमांचीही घेतली दखल 
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने ‘एमएचएमएच’ ॲप तयार केला. त्यात मृत्यू दर कमी करण्यासाठी ५० वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्याचा फायदा मृत्यूदर कमी करण्यासाठी झाला. त्यामुळे अनेक महापालिकांनी विचारणा करून हा ॲप तयार करण्याचा निर्णय घेतला. तसेच एक हजार मोबाईल फिवर क्लिनीक, शहराच्या एन्ट्री पॉइंटवर अँटिजेन व आरटीपीसीआर चाचणी अशा महापालिकेच्या विविध उपक्रमांची दखल घेतली गेली. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
 
दिवसभरात २३६६ चाचण्या 
शहरात शनिवारी (ता. आठ) दिवसभरात महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या एन्ट्री पॉइंटवर ३२६६ जणांच्या अॅन्टीजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यात ५८ जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यात परळी वैजनाथ, परभणी, चंद्रपूर, केज (बीड), कळमनुरी या भागातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सोळा जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad pattern of corona