शहरातील चौकाचौकांत पादचारी सैरभैर 

photo
photo

औरंगाबाद : शहरातील वाहतूक व्यवस्थेत कमालीचा बेशिस्तपणा आला आहे. वाहनधारकांच्या बेशिस्तीत पादचाऱ्यांचा विचार केला जात नाही. त्यामुळेच रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांची चौका-चौकांत सैरभैर अवस्था झाली आहे. 

वाहनधारकांच्या बेशिस्तीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. पोलिस वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करीत असताना दुसरीकडे वाहनधारक बेशिस्तपणा सोडत नाहीत. त्यामुळेच पोलिसांनी आता कठोर भूमिका घेणे आवश्‍यक आहे. औरंगाबाद शहरात देश-विदेशांतील पर्यटक हजेरी लावत असतात. देशाच्या कानाकोपऱ्यांतील व्यापारी, उद्योजकही व्यवसायानिमित्त शहरात येत असतात. रोज शहरात येणाऱ्या हजारो पर्यटक, उद्योजकांसमोर शहराच्या बेशिस्त वाहतुकीचे दर्शन होत आहे. वाहतुकीच्या बेशिस्तीत वाहनधारकांचा मोठा वाटा आहे. 

अडथळेच अडथळे 

शहरातील सिडको बसस्थानक, वसंतराव नाईक चौक, मुकुंदवाडी चौक, महावीर चौक (बाबा पेट्रोलपंप), सेव्हन हिल, औरंगपुरा, गुलमंडी, मध्यवर्ती बसस्थानक परिसर अशा ठिकाणी आणि चौकांमध्ये वाहनधारक स्टॉपलाइन तर ओलांडतातच; मात्र त्याहीपुढे जाऊन पादचाऱ्यांच्या हक्काच्या झेब्रा क्रॉसिंगवरही अतिक्रमण करून उभे राहतात. झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे जाऊन वाहनधारक उभे राहत असल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे अवघड झाले आहे. रस्ता ओलांडताना पादचारी अक्षरश: सैरभैर अवस्थेत अगदी जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडताना दिसत आहेत. 

पोलिसांचेही दुर्लक्षच 

रस्त्यावरच्या प्रत्येक चौकामध्ये चार ते पाच पोलिस उभे असतात. याच पोलिसांच्या समोर वाहनधारक स्टॉपलाइनच्या पुढे जाऊन उभे राहतात. त्यावर कारवाई केली जात नाही. वाहतूक पोलिस वाहनधारकांना वाट करून देण्यासाठी प्रयत्न करीत असताना सैरभैर झालेल्या नागरिकांना मात्र झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता ओलांडताना मदत करत नाहीत. 

रिक्षाचालकांचा अधिक त्रास 

रिक्षाचालकांचा प्रत्येक चौकात कायम ठिय्या असतो. चौकात वाहतुकीची तमा न बाळगता कायम घुटमळत राहणे, गिरक्‍या मारणे अशा कृतीमुळे सातत्याने वाहतुकीस खोळंबा होतो. तरीही रिक्षाचालकांना मात्र देणे-घेणे नसते. रिक्षाचालक रस्त्याने चालताना केव्हा ब्रेक मारेल, याचा नेम नसतो. पाठीमागच्या वाहनांचा विचार न करता अचानक वाहन थांबवण्याच्या रिक्षाचालकांच्या कृतीमुळे पादचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. 

पादचाऱ्यांच्या वेळेवरही हल्ला 

चौकातील प्रत्येक सिग्नलवर वाहनधारकांना ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर पादचाऱ्यांसाठीचा पाच ते दहा सेकंदाचा वेळ ठेवलेला आहे; मात्र हा वेळ वाहनधारक वापरतात. सिग्नल सुरू होण्याच्या पूर्वी पादचाऱ्यांच्या वेळेतच वाहनधारक निघत असल्याने पादचाऱ्यांना वेळ मिळत नाही. परिणामी, जशी संधी मिळेल तसे पादचारी रस्त्यावरून धावाधाव करताना दिसत आहेत. हे सर्व पोलिसांच्या साक्षीने सुरू आहे. पुणे-मुंबई येथे पादचाऱ्यांना झेब्रा क्रॉसिंगवरून ओलांडताना मदत होईल अशा पद्धतीचे वाहनधारकांचे वर्तन आहे. आपल्या शहरातील परिस्थिती नेमकी उलट आणि विरोधी आहे. 

पादचारी हा रस्त्याचा राजा 

पादचारी हा रस्त्याचा राजा आहे. रस्त्यावरून जाण्याचा पहिला अधिकार हा पादचाऱ्यांचा असतो. विदेशामध्ये रस्त्यात एखादी व्यक्ती आली तर सर्व वाहने थांबवली जातात; मात्र आपल्याकडे वाहनधारक समोर आला तर अधिक वेगाने वाहन चालवले जाते. परिणामी पादचाऱ्याची सैरभैर अवस्था होते. जीव मुठीत घेऊन पादचाऱ्याला रस्त्याच्या एका कडेहून दुसऱ्या कडेला अक्षरश: धावत - पळत जावे लागते. चौकात मिनिटा-मिनिटाला ही अवस्था पोलिस पाहत असताना ते पादचाऱ्यांना रस्ता मोकळा करून देत नाहीत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com