ताप आहे, मास्क नाही तर, थांबवेल ‘अर्जुना’ पहा (VIDEO)

अतुल पाटील 
Saturday, 29 August 2020

कोव्हीड १९च्या पार्श्‍वभूमीवर अजिंक्य कलंत्रीने तयार केले रोबोटिक यंत्र 

औरंगाबाद : अंगात ताप आहे. तोंडाला मास्क नाही. हाताचे निर्जंतुकीकरण केलेले नाही. एवढेच काय हजेरी घेण्यापासून तर, एखाद्याने अल्कहोल तर घेतले नाही ना? याची पडताळणी करण्याचे काम एकटा ‘अर्जुना’ करतोय. होय! तो अर्जुना म्हणजेच ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’वर आधारित सिस्कॉर्ट टेक्नॉलॉजीचे संचालक अजिंक्य कलंत्री याने बनविलेले रोबोटिक यंत्र आहे. मेड इन औरंगाबाद अर्जुना सध्या कंपन्या, कार्यालये, शोरुम्समध्ये दिमाखात विराजमान होतोय. जोखीम कमी हीच अर्जुनाची खास बाब आहे. 

कोरोना विषाणुने थैमान घालायला सुरवात झाल्यानंतर शारिरीक अंतर पाळणे आणि कोरोनाला दुर ठेवण्यासाठी प्रयत्न होऊ लागले. यात थर्मामीटर, ऑक्सीमीटर यासारखी यंत्रे आली. ॲक्युरिसीबद्दलही शंका होत्या. तपासताना मानवाला धोका होताच. यावर आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची मदत घेत काम करायचे अजिंक्यने ठरवले. मानवरहित यंत्र तयार करण्याची आयडिया आली. या यंत्राद्वारे ताप आहे का?, मास्क घातले का?, हात सॅनिटाईज केले का? याचे डिटेक्शन होते. पुर्तता असेल तर, त्या व्यक्तीला प्रवेश दिला जातो. 

कोरोनानंतरही वापरात यावे यासाठी अल्कहोलिक व्यक्ती ओळखता येणार आहे. कार्यालयांसाठी टाईम अटेंडन्सचे देखील फिचर देण्यात आले आहे. क्लायंटच्या मागणीनुसार, यात पल्स ऑक्सीमीटरदेखील यापुढे असणार आहे. राज्य सरकारकडुन दखल घेतली असुन उद्योगमंत्री सुभाष देसाई, मंत्री धनंजय मुंडे यांनीही संपर्क साधला असल्याचे अजिंक्यने ‘सकाळ’ला सांगितले. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

यंत्र आहे तरी कसे? 
अर्जुना हे ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’वर आधारित एक रोबोटिक यंत्र आहे. कोवीड १९ च्या पार्श्‍वभूमीवर शारिरीक अंतर आणि निर्जंतुकीकरणाची काळजी घेते. यामध्ये व्हिजिटरचा टॅबद्वारे मास्क, शरीरातील तापमान तपासले जाते, हातावर सॅनिटायझर टाकले जाते. त्यानंतरच बॅरिकेडस् उघडुन प्रवेश दिला जातो. 

असं आहे यात खास! 
यंत्रातील टॅबलेटमध्ये सिस्कॉर्टने तयार केलेले सॉफ्टवेअर आहे. मास्क टॅबमध्ये फोटो घेतला जातो. त्यानुसार हार्डवेअरला सूचना मिळतात. यात व्हिजीटरचा डाटादेखील साठवला जातो. नोंदणीकृत व्यक्तींचा टाईम अटेंडन्सदेखील घेता येतो. पुर्तता नसेल तर अलर्ट आणि बझर वाजला जातो. हे ॲप मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये आहे. तिन्ही भाषेत कमांड देते. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

इथे होतोय उपयोग! 
अर्जुनाचा उपयोग सध्या कार्यालये, रिटेल शोरुम्स्, कंपन्या याठिकाणी होत आहे. तसेच मॉल्स्, विमानतळे, रेल्वेस्टेशन, बसस्थानके, सार्वजनिक वाहतुक याप्रमाणेच मंदीरात प्रवेश करतानाही याचा उपयोग होऊ शकतो. सरकारी कार्यालयातुन आणि परदेशातुनही मागणी आहे. जास्त मागणी वाढल्यास त्यांनाही पुरवठा करण्याची व्यवस्था निर्माण केली जात आहे. 

चारच महिन्यात तयार 
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अर्जुना यंत्र बनवायला सुरवात केली. यानंतर तयार व्हायला तीन महिन्यांचा कालावधी लागला. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासुन मार्केटमध्ये उपलब्ध होऊ लागले. साधारणत: एक दिवसात एक यंत्र बनवले जाते. फॅब्रिकेशनचे काम पुण्यात होते. तर हडको (औरंगाबाद) येथे असेंबली होत आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

खर्चही आला दांडगा 
अर्जुना यंत्र विकसीत करायला, २५ लाख रुपयांपर्यंत खर्च आला. मनुष्यबळ, संशोधन, वाहतुक आदींसाठी हा खर्च आहे. यासाठी २५ जणांची टीम कार्यरत होती. याशिवाय आणखी २५ जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आतापर्यंत ४५ यंत्रे विक्री झाली आहेत. तसेच १०० यंत्रांची ऑर्डर कंपनीला मिळाली आहे. 

 

लॉकडाऊन हेच आव्हान 
रॉ मटेरिअलचे लॉजिस्टिक हे खुप मोठे आव्हान आहे. कारण लॉकडाऊन, ई पासेसचे इश्‍यु आहेत. त्यामुळे विलंब होतो. बाहेर कुठे जायचे तर, सार्वजनिक वाहतुक नाही. युरोपमधुन येणाऱ्या सेंसरला कस्टम क्लिअरन्स मिळत नाही. त्यामुळेही वेळ लागत आहे. मात करण्यासाठी स्वत:च जावे लागले. दिल्लीला विमानाने तर, गुजरातला स्वत: ड्राईव्ह करावे लागले. 
- अजिंक्य कलंत्री, संचालक, सिस्कॉर्ट टेक्नॉलॉजी प्रा. लि. औरंगाबाद. 

 

(संपादन-प्रताप अवचार) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Startup News Ajinkya Kalantri create Robotic device