उस्ताद वासीफुद्दीन डागर यांना नाद गौरव पुरस्कार  

 औरंगाबाद : पद्मश्री उस्ताद वासीफुद्दीन डागर, पद्मश्री शंकरबापू आपेगावकर.
औरंगाबाद : पद्मश्री उस्ताद वासीफुद्दीन डागर, पद्मश्री शंकरबापू आपेगावकर.

औरंगाबाद - पद्मश्री शंकरबापू आपेगावकर नाद गौरव पुरस्कार धृपद घराण्याचे प्रख्यात गायक उस्ताद वासीफुद्दीन डागर यांना जाहीर झाला आहे. वारकरी सांप्रदायिक तसेच कला क्षेत्रात मराठवाड्याची आगळी वेगळी ओळख निर्माण करणारे पद्मश्री शंकरबापू आपेगावकर यांच्या 15 व्या स्मृतिदिनानिमित्त शनीवारी (ता.एक) आयोजित धृपद संगीत संध्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. भानुदासराव चव्हाण सभागृहात सायंकाळी 6.30 वाजता हा समारंभ होणार आहे. 

पद्मश्री शंकरबापू आपेगावकर इंग्लिश स्कूलच्यावतीने या समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. "लाउनि मृदंग श्रृति टाळ घोष ' या जगदगुरु तुकोबारायांच्या उक्‍तीप्रमाणे आपेगाव येथे विठ्ठल भक्‍तीचा वसा घेतलेल्या वारकरी कुटूंबात जन्मलेले शंकरबापू आपेगावकर. लहाणपणापासूनच पखवाज वाजवण्याची त्यांच्यात आवड निर्माण झाली. बंकटस्वामी महाराज हे त्यांचे अध्यात्मिक गुरु, त्यांनीच पखवाजाची शिकवण दिली. 

त्यानंतर मथुरेतील प्रसिद्ध पखवाज वादक मख्खनजी भैय्या यांच्याकडून शास्त्रीय पखवाजाचे शिक्षण घेतले आणि त्यांनी नंतर आयुष्यभर पखवाज आणि वारकरी सांप्रदायाची संस्कृती जोपासली. धृपद गायकीतील डागर बंधूसोबत त्यांनी साथ संगत केली. धृपद गायन, भजन, किर्तन, रुद्रविणा वादन आदींच्या साथीने नटलेला त्यांचा पखवाज आजही घुमतो आहे.

 त्यांच्या नावाने दिला जाणारा नाद पुरस्कार प्रख्यात धृपद गायक पद्मश्री उस्ताद वासीफुद्दीन डागर यांना यंदा जाहीर झाला आहे. यानिमित्ताने उस्ताद डागर यांचे गायन होणार आहे. तसेच पंडीत नाथराव नेरळकर यांच्या भैरवीने मैफलीची सांगता होईल. पखवाजवर पंडित उद्धवरावबापू आपेगावकर साथ संगत करणार आहेत. 

पुरस्कार प्रदान समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मीना शेळके राहतील. तर प्रमुख पाहूणे म्हणुन ज्ञानोबा महाराज डाके उपस्थित राहणार आहेत. या संगीत यज्ञाचा रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांच्यावतीने अमित भोसेकर, प्रविण देवणे यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com