VIDEO : योगेशने बनवलेल्या यंत्राने शेतकऱ्यांच्या पाठीवरच ओझं उतरवलं ! 

atul creativey.jpg
atul creativey.jpg

औरंगाबाद : पाठीवरच्या हातपंप सायकलच्या चाकावर आणून सुलभरित्या फवारणी व्हावी, यासाठी तयार केलेल्या यंत्राला अगदी लॉकडाऊनमध्येही प्रचंड मागणी आहे. याकाळात अडीचशे यंत्र विकली असुन गेल्या चार वर्षात साडेबाराशे पेक्षा जास्त यंत्रे शेतकऱ्यांनी घेतली आहेत. शेतकऱ्यांच्या सूचनांनुसार वेळोवेळी केलेल्या बदलांमुळेच हे यश मिळाल्याचे औरंगाबादच्या नियो इनोवेटिव्ह सोल्यूशन्स एलएलपी कंपनीचे संचालक योगेश गावंडे यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

योगेश हे मूळचे चित्तेपिंपळगावचे. सातवीत असताना काका प्रा. तुकाराम गावंडे यांच्यासोबत औरंगाबाद शहरात आले. बारावीपर्यंत त्यांच्याकडेच राहिले. पुढील शिक्षणासाठी ते घरातून बाहेर पडले. देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना हवेवर चालणाऱ्या इंजिनवर ते काम करू लागले.

यावरूनच योगेश आणि चुलतभाऊ निखिल यांना सायकलवरील औषध फवारणी पंपाची कल्पना सुचली. तसे यंत्रही बनविले. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असतानाच स्पर्धेत भाग घेत प्रदर्शनात ते यंत्र ठेवले. यात प्रथम क्रमांक पटकावला. इथूनच त्यांना बळ मिळाले.

औषधपंप पाठीवर घेऊन फवारणी करायला लागायची. भरलेला पंप उचलायचे असो किंवा पुन्हा औषध भरण्यासाठी लागणारी कसरत असो. यात मध्येच थांबायची पंचाईत व्हायची. सतत हाताने पंप मारल्याने शारीरिक श्रम त्रासदायक होते. इंधनावरील औषधी पंपाचा पर्याय होता; मात्र पाठीवरील ओझ्याचा प्रश्‍न कायम होता. त्यामुळे योगेश यांनी औषध फवारणीचा पंप पाठीवरून सायकलच्या चाकावर आणला. बाजारातील हातपंपाऐवजी स्वत:च डिझाइन केलेली टाकी त्याला जोडली. निर्मिती खर्चातील कपातीसाठी संशोधन करून अनेक बारीक-सारीक बदलही केले आहेत. कोरोनाकाळात शहरातील दाट वस्तीत एखादा बाधित सापडल्यानंतर जिथे अग्निशमण बंब पोहचणे शक्य नव्हते, त्याठिकाणी फवारणी करण्यासाठी हे यंत्र उपयुक्त ठरले आहे.

हे यंत्र आहे तरी कसे?
सायकलचे चाक चालेल तशी फवारणी होते. टाकीची क्षमता २४ लिटर असुन चारपट अधिक फवारणी होते. एकाचवेळी १६ फूट क्षेत्र व्यापते. सरीच्या रुंदीनुसार नोझल सेट करता येऊ शकतो. पिकांनुसार उंची सात फुटांपर्यंत वाढवता येते. सायकल पंपामुळे मजुराच्या पैशात बचत झाली. मॅन्युअल आणि बॅटरीवर चालणारे पंप आहेत.

मॅन्युअल नियो स्प्रे पंप
या यंत्राला इंधनाची गरज नाही. २०-३० मिनिटात एक एकरावर फवारणी करता येते. मुले, महिला सहजतेने फवारणी करू शकतात. प्रेशर भरपुर असल्याने फवारणी व्यवस्थित होते. यंत्राला इतर कोणताही खर्च येत नाही.

बॅटरीचालित नियो स्प्रे पंप
चार्जिंगसाठी सहा ते सात तास वेळ लागतो. तसेच पाच ते सहा तास वापरता येते. दबाव नियंत्रित करण्यासाठी उच्च गुणवत्तेचे रेग्युलेटर आहे. एक एकर जमीन ३० मिनिटांत फवारते. पूर्ण चार्ज बॅटरीसह ८-१२ एकर क्षेत्र स्प्रे केले जाऊ शकते.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
बाराशेहून अधिक यंत्रांची विक्री
२०१६ मध्ये १६० यंत्रे, २०१७ मध्ये १४४ यंत्रे, २०१८ मध्ये १०८ यंत्रे, २०१९ मध्ये ५५० यंत्रे आणि २०२० मध्ये २५० यंत्रे विक्री झाली आहेत. सोबतच सकाळ ऍग्रोवनच्या कृषी प्रदर्शनात पन्नासहून अधिक यंत्रांची विक्री झाली. आता या यंत्राची किंमत आठ हजार पाचशे रुपये आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com